कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौरपदी मंगळवारी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या उच्चशिक्षित नगरसेविका ॲड. हर्षाली चौधरी-थविल, उपमहापौरपदी भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांची सर्वानुमते बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीमुळे पालिकेत करोना महासाथ काळापासून म्हणजेच नोव्हेंबर २०२० पासून सुरू असलेली सहा वर्षाची प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे. महापौर, उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. बिनविरोध निवडीची प्रक्रिया मंगळवारी दुपारी मुंबई जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी आँचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, सचिव किशोर शेळके उपस्थित होते.
करोना साथीचा फटका
कल्याण डोंबिवली पालिकेची ऑक्टोबर २०१५ मध्ये पालिका निवडणूक झाली होती. ही मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये संपुष्टात आली होती. या कालावधीत जागतिक करोना महासाथ सुरू झाली होती. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर तीन वर्ष या साथीचा प्रभाव राहिल्याने मुदत संपलेल्या महापालिकांवर शासनाने तेथील आयुक्तांना प्रशासक नेमले. कल्याण डोंबिवली पालिकेवर मागील सहा वर्ष आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय राजवट सुरू होती. कल्याण पालिकेवर १९८३ ते १९९५ या कालावधीत प्रशासकीय राजवट होती. १९९५ मध्ये कल्याण डोंबिवली पालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक होऊन पालिकेत लोकप्रतिनिधी राजवट आली. १२ वर्षाच्या या प्रशासकीय राजवटीनंतर करोना महासाथ काळातील सहा वर्षाची प्रशासकीय राजवट पालिकेवर सुरू होती.
भगवे वातावरण
पालिकेत शिवसेना, भाजप आणि मनसे युतीच्या नगरसेवक, नगरसेविकांनी भगवे फेटे बांधले होते. त्यामुळे सभागृह भगवेमय झाले होते. मी नगरसेवक, नगरसेविका झालो. पालिकेत पहिल्यांदाच सभागृहात बसलो. हा आनंद प्रत्येक नवीन नगरसेवकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. माजी ज्येष्ठ नगरसेवक सभागृहात एकमेकांना चिमटे घेत, शरोशायरी करत सभागृहात हास्याचे फुलोरे उडवत होते.
बेपत्ता नगरसेवक सभागृहात
निवडीच्या आवश्यक प्रक्रिया पार पडल्यानंतर पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आँचल गोयल यांनी महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल, उपमहापौर म्हणून राहुल दामले यांची निवड जाहीर केली. या दोन्ही निवड प्रक्रिया पार पडताच सभागृहात महायुतीच्या नगरसेवकांनी जयघोष केला. सभागृहात काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचा एक आणि ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक असे एकूण ११ नगरसेवक विरोधी बाकावर बसले होते. महापौर निवडीच्या दोन दिवस अगोदर मागील सोळा दिवस बेपत्ता असलेले ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे आपल्या घरी परतले होते. मागील सोळा दिवस शोध घेऊनही न सापडलेल्या आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बेपत्ता म्हणून जाहीर केलेल्या नगरसेविका ॲड. कीर्ति ढोणे, स्वप्नाली केणे, नगरसेवक राहुल कोट ठाकरे गटाच्या बाजुने सभागृहात बसले होते. हे नगरसेवक सभागृहात काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा होत्या. या नगरसेवकांनी पक्षाचा आदेश पाळला नसता तर त्यांच्यावर ठाकरे गटाकडून अपात्रतेच्या कारवाईची प्रक्रिया कोकणभवन येथे विभागीय आयुक्तांकडे सुरू करण्यात येणार होती.

