ठाणे : शिळ -डायघर येथील एका धार्मिक स्थळाच्या परिसरात तीन जणांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतर ठाणे पोलिसांनी धार्मिक स्थळांच्या परिसरात बारकाईने लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांचे यापूर्वीच ‘गुड माॅर्गिंग पथक’ तसेच रात्रीच्या वेळेत गस्ती पथके कार्यरत आहेत. ठाणे जिल्हा भूमिपूत्र संघटना आणि ओबीसी एकीकरण समितीने देखील पोलीस आयुक्तांकडे धार्मिक स्थळांवरील सेवेकऱ्यांच्या पोलीस पडताळणी करण्याची मागणी करून त्यांसदर्भाचे पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिले आहे. नवी मुंबई येथे राहणाऱ्या विवाहितीचे तिच्या सासरकडील नातेवाईकांसोबत वाद झाले होते. त्यामुळे ती ६ जुलैला शिळगाव येथील एका धार्मिक स्थळात आली होती. तेथील तीन सेवेकऱ्यांनी तिच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केले. महिला शुद्धीत आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. ती पळून जात असताना तिघांनी तिला मारहाण करून तिचे डोके जमीनीवर आपटले. त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली. तिचे प्रेत मंदिराच्या परिसरात एका झुडपामध्ये फेकून दिले. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी श्यामसुंदर शर्मा, संतोषकुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तिघांना अटक केली आहे. असे असले तरी धार्मिक स्थळातील भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. हे ही वाचा. कारण राजकारण: मुंब्य्रात आव्हाडांना आव्हान कोणाचे? ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्याप्रमाणात धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळांची पोलिसांकडून पाहणी केली जात असते. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात गुड माॅर्निंग पथक आणि रात्रीच्या वेळेत गस्ती पथके तैनात असतात. परंतु या प्रकरणानंतर आता धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यास सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. हे ही वाचा. ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, अफवा पसरवून गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेशाध्यक्षाचे संकेत डायघर येथे झालेल्या प्रकारानंतर सर्वच धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही लावणे आणि येथे कार्यरत असलेल्या सेवेकऱ्यांची पोलीस पडताळणी करण्याची मागणी ठाणे जिल्हा भूमिपुत्र संघटना आणि ओबीसी एकीकरण समितीने केली आहे. त्यांच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.