ठाणे : पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडून दुर्घटना घडू नयेत यासाठी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने काही महिन्यांपुर्वी वृक्ष छाटणी मोहिम राबवली. या मोहिमेनंतर शहरात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार सुरूच असून गेल्या तीन दिवसांत शहरात ३५ वृक्ष उन्मळून पडली आहेत. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नसली तरी ११ वाहनांचे नुकसान झाले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत. अशा घटनांमध्ये यापुर्वी काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच झाडांच्या फांद्या पडण्याचे प्रकारही घडत असून या फांद्या आणि झाडे वाहनांवर पडून वाहनांचे नुकसान होत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी पालिकेने काही वर्षांपुर्वी झाडांच्या बुंध्याभोवती असलेले सिमेंट काँक्रीट काढून त्याठिकाणी माती टाकण्याचे काम केले होते.
तरीही वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार सुरूच होते. अनेकदा वृक्षांच्या फांद्या छाटणी करताना ती योग्यप्रकारे केली जात नव्हती. यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यादरम्यान वृक्षांचा तोल जाऊन ते पडत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. यामुळे यंदा पावसाळ्यापुर्वी झाडांच्या फांद्याची छाटणी करताना त्यांचा तोल जाणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. परंतु त्यानंतरही शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरूच असल्याचे चित्र असून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसादरम्यान ३५ वृक्ष उन्मळून पडले तर, २२ ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्या आहेत.
कुठे वृक्ष पडले
पावसामुळे शहरातील विविध भागांत एकूण ३५ झाडे तर, २२ फांद्या उन्मळूून कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यात मंगळवारी ब्रम्हांड येथील आझाद नगर परिसरात डी ब्लॉक सोसायटीतील आवारात झाड कोसळून चारचाकी चार वाहनांचे नुकसान झाले. गावंडबाग येथे सूर्या टॉवरजवळ झाडाची फांदी पडून चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. कोकणी पाडा येथील बोबे चाळीतील दोन घरांवर झाड कोसळले. यात जिवीतहानी टळली असली तरी घरांचे पत्रे तुटून नुकसान झाले. बुधवारी राबोडी येथील आकाशगंगा कॉम्प्लेक्स सोसायटीच्या कार्यालयावर मोठे झाड कोसळून छतावरील पत्रे तुटून नुकसान झाले. कोपरी येथील सेवा समिती सभागृहाजवळ झाड कोसळून दोन वाहनांचे नुकसान झाले. गुरूवारी वर्तकनगर येथील लक्ष्मी नारायण सोसायटी मध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर झाड कोसळले. वसंत विहार येथे झाड कोसळून तीन चारचाकी वाहनांचे नुकसाने झाले.
यंदा जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहेत. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने झाडांच्या बुंध्याजवळील माती भुसभुशीत झाली आहे. यामुळे झाडे पडत आहेत. तसेच सोसायटीच्या आवारातील झाडांच्या फांद्यांची पालिका छाटणी करत नाही. राजेश सोनावणे सहाय्यक आयुक्त, वृक्ष प्राधिकरण विभाग, ठाणे महापालिका