कल्याण-डोंबिवलीत उमेदवारीमध्ये आगरी समाजाचे वर्चस्व
कल्याण-डोंबिवली महापालिकेवर पुन्हा आगरी समाजाचे वर्चस्व असेल, असे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. कारण महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार झाली असून यामध्ये पाटील, म्हात्रे, गायकवाड आणि भोईर आडनाव असलेल्या उमेदवारांचा मोठय़ा प्रमाणावर भरणा असल्याचे दिसून येत आहे. एकूण ७५० उमेदवारांपैकी ५८ उमेदवार पाटील आडनावाचे आहेत, तर त्याखालोखाल म्हात्रे (४४ उमेदवार), गायकवाड (३१ उमेदवार), भोईर (२८ उमेदवार) आणि जाधव (२५ उमेदवार) यांचा समावेश आहे. शेख या आडनावाचेही १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कल्याण, डोंबिवलीतील बहुतांश प्रभाग ब्राह्मणबहुल असले तरी या समाजाचे अत्यल्प उमेदवार िरगणात आहेत.
कोणत्याही निवडणुकांच्या दरम्यान जातीय, धार्मिक आणि प्रांतिक अस्मिता उफाळून येते. यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षांनी प्रभागनिहाय अभ्यास करून प्रत्येक प्रभागाची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन त्या-त्या भागातील समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

’७५० प्रभागांमध्ये ३३३ प्रकारच्या आडनावांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
’पाटील, म्हात्रे, गायकवाड, भोईर, जाधव या आडनावाचे सर्वाधिक उमेदवार
’शेख या आडनावाचे १५ उमेदवार रिंगणात.
’११ पावशे, १० चौधरी, तर कदम, मोरे, पवार, तरे या आडनावाचे नऊ जण निवडणूक लढवत आहेत.
’भोसले, भगत, सोनावणे, गायकर यांची संख्या प्रत्येकी आठ आहे.

अन्य भाषिक उमेदवार
दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय आणि गुजराथी समाजाच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. नायडू, रेड्डी, शेट्टी, कृष्णमूर्ती, त्रिपाठी, मिश्रा, जयस्वाल, उपाध्य, पटेल, शहा, प्रजापती या आडनावाचेही उमेदवार आहेत. मुस्लीम समाजातील १५ शेख, ५ खान, त्याशिवाय खोत, कुरेशी, पठाण, डोन निवडणूक रिंगणात आहेत.