Aimim Corporator Sahar Yunus Shaikh: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडल्यापासून देशभरात एक नाव प्रचंड गाजल आहे. ते म्हणजे ठाणे महापालिका निवडणूकीत विजयी झालेल्या मुंब्य्रातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या तरुण नगरसेविका सहर शेख. सहर शेख यांनी काही दिवसांपूर्वी मुंब्य्रातील सभेत ‘कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है’ हे वक्तव्य केले होते.
त्यांचे हे वक्तव्य समाजमाध्यमांवर प्रचंड वायरल झाले. या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात, त्या म्हणाल्या आहेत की, ‘भारत कुणाच्या बापाचा नाही, आम्ही भारतीय मुस्लीम आहोत!’या विधानामुळे पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत.
मुंब्य्रात सहर शेख यांच्यासह एआयएमआयएमचे पाच नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा धक्का मनाला जातो. या विजयानंतर भाषण करताना शेख यांनी ‘कैसा हराया, अभी हमलोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है’ असे वक्तव्य करत आव्हाडांना डिवचले होते. त्यांचे हे वक्तव्य समाजमाध्यमांवर प्रचंड प्रसारित झाले असून यावर सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. यानंतर पोलिसांनी सहार शेख यांना नोटीस बजावली.
मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सहर शेखच्या चौकशीचा अहवाल सादर केला. त्यात ‘अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है’ या वक्तव्याबद्दल तिने २३ जानेवारी २०२६ रोजी माफीनामा दिला आहे, असे शिंदे यांनी लिखित स्वरूपात दिले. परंतू, त्यानंतर, नगरसेविका सहर शेख यांनी या माफीनाम्याबाबत मोठे विधान केले. त्या म्हणाल्या ‘मी माफीनामा दिलेला नाही तर, त्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मुंब्रा येथे झालेल्या सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाच्या झेंड्याबाबत होते. आमच्या पक्षाचा आणि आणखी काही पक्षांच्या झेंड्यांचा रंग हिरवा आहे.
त्यामुळे ते सुद्धा अशी विधाने करतात. तसेच शहर भगवे करू असे विधान काही पक्ष करतात. मी तसेच विधान केले होते. पण, त्याचा चुकीचा अर्थ काढून चुकीचे आरोप लावले. अनेक लोक जाती धर्माचे राजकारण करत असून ते चुकीचे आहे’, असे त्या म्हणाल्या.
आम्ही भारतीय मुस्लीम आहोत!
पत्रकारांशी संवाद साधताना नगरसेविका सहर युनूस शेख म्हणाल्या, “आम्ही भारतीय मुस्लीम आहोत आणि आम्हाला कुठे जायचे आहे हे कोणीही सांगू शकत नाही. हा देश आमचाच आहे. मंब्रामध्ये हिंदू आणि मुस्लीम सलोख्याने राहतात. जनतेला वास्तव माहीत आहे आणि अनेक हिंदूंनीही माझ्या समर्थनार्थ पुढे येत साथ दिली आहे, कारण अनेक ठिकाणी माझ्या वक्तव्यांच्या क्लिप्स अपूर्ण स्वरूपात दाखवल्या जात आहेत.” असा आरोप त्यांनी केला आहे.
