लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी ८.५९ वाजता फलाट क्रमांक पाचवर आलेल्या जलद लोकलचे दरवाजे विहित वेळेत स्वयंचलित पध्दतीने बंद न झाल्याने वातानुकूलित लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात १२ मिनिटे खोळंबली. आपण दरवाजात लटकत आहोत. आपल्यामुळे लोकलचे दरवाजे बंद होत नाहीत, हे माहिती असुनही अनेक प्रवासी दरवाजातच लोंबकळत होते. त्यामुळे लोकलचे दरवाजे बंद होण्यास अडथळा आला होता.

१२ मिनिटे झाली तरी लोकल सुरू न झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. सकाळच्या वेळेत फलाट क्रमांक पाच आणि तीन वर डोंबिवली रेल्वे स्थानकात वातानुकूलित लोकलचे दरवाजे प्रवासी चढल्यानंतर बंद व्हावेत. किंवा काही प्रवाशांना दरवाजातून डब्यात लोटण्यासाठी रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तैनात असतात. वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होत नाहीत तोपर्यंत हे जवान बाहेरून जोर लावून प्रवाशांना डब्यात लोटत असतात.

आणखी वाचा-भिवंडी येथील राड्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याची बदली

कल्याणकडून सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल गुरुवारी सकाळी फलाट क्रमांक पाचवर आली. सलगच्या तीन सुट्ट्या नंतर कामावर जाण्याचा बुधवारी सकाळी पहिला दिवस होता. प्रत्येकाची कामावर जाण्याची घाई होती. त्यात आता उकाड्याला सुरूवात झाली आहे. ८.५९ च्या वातानुकूलित लोकलमध्ये सराईत प्रवाशांबरोबर इतर प्रवासी डब्यात घुसले. नवखे प्रवासी या लोकलच्या दरवाजात अडकून पडले. दरवाजे बंद होत नसल्याने १२ मिनिटे वातानुकूलित लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात खोळंबली. इतर जलद लोकल त्यामुळे ठाकुर्ली, कल्याण भागात रखडल्या.

रेल्वे सुरक्षा जवान प्रवाशांना डब्यात घुसविण्यासाठी ताकद लावून प्रयत्न करत होते. लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा जवान दरवाज्यात लोंबकळत असलेल्या प्रवाशांना खाली उतरण्यास तर काही प्रवाशांना आत जाण्याच्या सूचना करत होते. यामध्ये महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. रेल्वे सुरक्षा जवानांनी मुश्किलने प्रवाशांना डब्यात ढकलले. त्यानंतर वातानुकूलित लोकलचे दरवाजे स्वयंचलित पध्दतीने बंद झाले.

आणखी वाचा-अवजड वाहनांची अवेळी वाहतुक सुरूच; मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर कोंडी

सामान्य लोकलमधील प्रवासी वातानुकूलित लोकलच्या डब्यात तिकीट तपासणीस येत नाही म्हणून ठाणे, घाटकोपर, दादरपर्यंत प्रवास करतो. वातानुकूलित लोकलचा दरमहा, तिमाही पास काढुनही या लोकलमध्ये व्यवस्थित उभे राहण्यास जागा मिळत नसल्याने अन्य प्रवासी संतप्त आहेत.

ऑक्टोबरचे कडक उन, त्यामुळे होणारा उकाडा, घामाच्या धारा येत्या १५ दिवसानंतर सुरू होणार आहेत. त्यामुळे वातानुकूलित लोकलमधील गर्दी वाढण्याची भीती आहे. रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित लोकलमध्ये बदलापूर, कल्याण, डोंबिवलीपासून वातानुकूलित लोकलमधील तिकीट तपासणी नियमित दादरपर्यंत सुरू करावी. तरच या लोकलमधील सामान्य लोकलचे तिकीट असणाऱ्या प्रवाशांची घुसखोरी कमी होईल, असे प्रवाशांच्या तक्रारी आहेत. वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणीस आला तरी तो सामान्य प्रवाशाकडून दंड रक्कम भरून त्याला प्रवासाला मुभा देतो. अशा प्रवाशांना वातानुकूलित लोकलमधून उतरविण्याचा निर्णय रेल्वेने घ्यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.

आता कडक उन्हाळा, घामाच्या धारा सुरू होतील त्याप्रमाणे वातानुकूलित लोकलमधील प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे रेल्वेने या लोकलमधील तिकीट तपाणीसांची संख्या वाढविण्याची गरज आहे. -भूषण पत्की, प्रवासी, डोंबिवली.