डोंबिवली : वातानुकूलित लोकलचे तिकीट दर गुरुवारपासून कमी होताच प्रवाशांनी, उन्हामुळे तापणाऱ्या सामान्य लोकलकडे पाठ फिरवून गारेगार लोकलमधून प्रवास केला. यापूर्वी चढय़ा तिकीट दरामुळे इच्छा असूनही अनेकांना वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करता येत नव्हता. गुरुवारी मात्र थंडगार वातावरणात प्रवास करताना वेगळाच आनंद मिळत असल्याने नवीन प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान होते.
तिकीट दर कमी केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने वातानुकूलित लोकलची सकाळ, संध्याकाळची वारंवारिता वाढवावी. मुंबईतील कार्यालयीन वेळा पाहून टिटवाळा, अंबरनाथ, कल्याण, बदलापूर येथून सकाळच्या साडेसात ते साडेआठ दरम्यान वातानुकूलित लोकलची संख्या वाढवावी. लोकलमधील तिकीट तपासणीसांची संख्या वाढवावी. जेणेकरून अन्य प्रवासी या लोकलमध्ये चढणार नाहीत, अशा प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत.
विद्यार्थी, कल्याण, डोंबिवली परिसरातून मुंबईत किरकोळ व्यवसाय करणारे व्यावसायिक आज गारेगार प्रवासाचा आनंद लुटत होते. दुसऱ्या श्रेणीचे डबे प्रवाशांनी भरून गेले होते. प्रथम श्रेणीच्या डब्यातही प्रवाशांची गर्दी होती. काही महिन्यांपासून कल्याणकडून सीएसएमटीच्या दिशेने तुरळक प्रवासी घेऊन धावणारी वातानुकूलित लोकल गुरुवारी प्रवाशांनी खचाखच भरून धावत असल्याचे पाहून प्रवासी आश्चर्य व्यक्त करत होते. नियमित लोकलमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी आज गारेगार लोकलचा अनुभव घेण्यासाठी तिकीट काढून कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातून ठाणे, मुंबईच्या दिशेने गेले.
वातानुकूलित लोकल सुरू झाल्यापासून पास काढून मुंबईच्या दिशेने आरामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आजच्या वाढत्या प्रवाशांच्या गर्दीने कोंडी झाली. अशा प्रवाशांना लोकलमध्ये चढताना धक्केबुक्के आणि नेहमीची बसण्याची आरामदायी जागा मिळविताना कसरत करावी लागली.
सकाळची लोकल तुडुंब
कल्याणहून सकाळी मुंबईच्या दिशेने सुटणारी डोंबिवलीत ८.५९ मिनिटांनी फलाट क्रमांक पाचवर येणारी अतिजलद लोकल आज कल्याणहून प्रवाशांनी भरून आली होती. डोंबिवलीत नियमित लोकलसारखीच गर्दी गारेगार लोकलमध्ये झाली. उन्हाची काहिली, गरम झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या बहुतांशी प्रवाशांनी वातानुकूलित लोकलच्या प्रवासाला पसंती दिल्याचे दिसले.
वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी केल्यामुळे वातानुकूलित लोकलमधील प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. रेल्वे प्रशासनाने सकाळी सात ते नऊ वेळेत टिटवाळा, अंबरनाथ, कल्याण स्थानकातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या वातानुकूलित लोकलची संख्या वाढवावी.-सचिन दीक्षित, प्रवासी
मी विद्यार्थी आहे. वातानुकूलित लोकलचे तिकीट अधिक असल्याने दररोज महाविद्यायात नियमितच्या लोकलने जात होतो. आता वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी झाल्याने या लोकलमधील प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी प्रवास करत आहे. प्रवास सुखाचा होत असेल तर नियमितपणे या लोकलमधून प्रवास करीन. – ओजस चांदेकर, प्रवासी
गेल्या दोन महिन्यानंतर प्रथमच या लोकलमधील गर्दी वाढली आहे. घामाच्या धारातून मुक्तता मिळण्यासाठी प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्याला प्राधान्य देतील. रेल्वेने सकाळच्या वेळेत मुंबई दिशेकडे जाणाऱ्या व संध्याकाळी सीएसएमटीहून कल्याणकडे येणाऱ्या या लोकल वाढवाव्यात.-ऋषीकेश भवारी, प्रवासी