Airoli Katai Freeway construction update: मुंबईच्या मुक्त मार्गाच्या (फ्री वे) धर्तीवर उभारण्यात येत असलेला आणि नवी मुंबई ते डोंबिवली अंतर काही मिनिटांवर आणणाऱ्या ऐरोली काटई मुक्त मार्गाच्या उभारणीतील कोंडी लवकरच फुटणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जागेजागेच्या उपलब्धतेसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांनी राजपत्र जाहीर केले आहे. यातील संपादनायोग्य जागा मोकळी आहे. त्यामुळे मोबदला जाहीर होताच याचे भूसंपादन झाल्यास या मार्गाच्या उभारणीला गती मिळेल.

कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई हे अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ऐरोली ते काटई फ्री वेची निर्मिती केली जाते आहे. या मार्गात ऐरोली भागातील खाडीपासून या मार्गाची सुरूवात होते. तर हा मार्ग डोंबिवलीजवळी काटई चौकात येऊन उतरणार आहे. हा मार्ग पूर्णपणे उन्नत असून हा मार्ग शिळफाटा येथील डोंगरातून ऐरोलीला जातो. यातील बोगदा तयार असून ऐरोली दिशेच्या बहुतांश भागाचे काम पूर्ण झाले आहे. तर मुंब्रा वाय जंक्शन पुलावरून या रस्त्याची मार्गिका जाते. बोगदा आणि बोगद्यातून येणारा मार्ग मुंब्रा वाय जंक्शन पुलावर येऊन गेल्या अनेक वर्षांपासून येऊन थांबला आहे.

मात्र पुढच्या टप्प्यातील कामासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या मार्गाचे काम रखडले होते. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या या भागातील भूसंपादन करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. अखेर या मार्गात आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यासाठी आजा राजपत्र जाहीर करण्यात आले आहे. यात आवश्यक जागेचा तपशील आणि गावांच्या नावांची माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला ही जागा खुली आहे, त्यामुळे कोणत्याही भूखंडधारकाचे यात विस्थापन होणार नाही. तसेच पुनर्वसन किंवा पुनर्वसाहतीचाही प्रश्न उद्भवत नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास ऐरोली ते काटई मार्गाच्या उभारणीला गती मिळेल. १८.३३ हेक्टर जागा आवश्यक आहे.

ऐरोली – काटई रस्त्याच्या उभारणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबाबत नुकतेच राजपत्र जाहीर करत माहिती देण्यात आली आहे. ऐरोली – काटई मुक्त मार्गाच्या उर्वरित भागाच्या उभारणीसाठी १८.३३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. यामध्ये देसाई गावातील १०.३ हेक्टर, डावले ४.९२ हेक्टर, शीळ २.१२ हेक्टर, कौसा ०.५७ हेक्टर, डोखाळ ०.४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी जमिनीच्या मोबदल्याची रक्कम अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र जिल्हा प्रशासनाकडून सुमारे ९.५ कोटी रुपये प्रति हेक्टर असा प्राथमिक दर निश्चित करून सरकारकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.

ऐरोली काटई मुक्त मार्ग ( फ्री वे ) हा नवी मुंबई ते काटई अंतर कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. सुमारे १२ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून यामध्ये १.६८ किलोमीटर लांबीचे दोन मोठे बोगदे आहेत. मुंबई फ्री वेच्या धर्तीवर याची उभारणी करण्यात येत आहे. ठाणे बेलापूर रस्ता ते रा.महामार्ग क्र ४, ऐरोली पूल ते ठाणे बेलापूर रस्ता आणि रा.महामार्ग क्र ४ ते काटई नाका जंक्शन असे तीन महत्वाचे टप्पे यात आहे. या प्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर नवी मुंबई ते काटई हे ४५ मिनिटांचे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांवर येणार आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथून नवी मुंबईच्या आणि मुंबई दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची महापे, शिळफाटा मार्गावरच्या कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.

ऐरोली – काटई मार्गाच्या उर्वरित भागाच्या उभारणीसाठी भूसंपादन करण्यात येत आहे. याबाबत नोटीस जाहीर करण्यात आली आहे. येथील जमिनीच्या मोबदल्या बाबत प्रस्ताव पुढे पाठविण्यात आला आहे.– वरुणकुमार सहारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), ठाणे