पाऊण तासाचा प्रवास दहा मिनिटांत होणार 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली भागातील नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ऐरोली-काटई फ्री वे उभारण्यात असून या प्रकल्पातील ऐरोली-मुंब्रा भागातील बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी पाहणी दौऱ्यादरम्यान दिली.

सद्य:स्थितीत या मार्गावरील प्रवासासाठी ४५ मिनिटे ते एक तासांचा अवधी लागत आहे. परंतु वर्षअखेरीस या रस्त्याची एक मार्गिका वापरासाठी खुली होऊ शकणार असून यामुळे या मार्गावरील प्रवास अवघ्या दहा मिनिटांत होणार आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. 

मुंबई फ्री वेच्या धर्तीवर ऐरोली-काटई फ्री वे चा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी मार्गातील ऐरोली ते मुंब्रा भागात १.८ किलोमीटरचा बोगदा उभारला जात आहे. या बोगद्यामुळे वाहनचालकांचा १२ किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. सद्य:स्थितीत १२ किमीचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना ४५ मिनिटे ते एक तास अवधी लागतो. मात्र बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांचा होणार आहे. १.८ किलोमीटर लांबीच्या या बोगद्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाच्या कामाची खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी पाहणी केली. ऐरोली ते मुंब्रा (टप्पा एक ) या ३.७ किलोमीटर मार्गातील १.८ किलोमीटरचा बोगदा जवळपास पूर्ण झाला आहे. यातील १.२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून अवघ्या पाचशे मीटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ऐरोली ते मुंब्रा या मार्गातील एक मार्गिका वर्षअखेरीस सुरू होईल, अशी माहिती शिंदे यांनी पाहणी दौऱ्यानंतर दिली. या रस्त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली या शहरातील वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.  मुंबई फ्री वेच्या धर्तीवर ऐरोली-काटई फ्री वे चा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचा अडथळे मुक्त तसेच विनाशुल्क प्रवास होणार आहे. तसेच उपनगरातील वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यानंतर त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली. मुंब्रा ते काटई (टप्पा दोन) रस्त्यासाठी तातडीने भूसंपादन करण्याची मागणी शिंदे यांनी या वेळी केली. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यास रस्त्याचा उर्वरित भागही डिसेंबर २०२३ पर्यंत मार्गी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण

मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाच्या उभारणीतील अडचणी आणि समस्या सोडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पुलाचे काम वेगाने पूर्ण होत असून यावरून लवकरच वाहतूक सुरू होणार आहे. तसेच या उड्डाणपुलामुळे वाहनचालकांना कोंडीमुक्तप्रवास करता येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

रेल्वेच्या नोटिसांना विरोध

सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण लोकसभा मतदारसंघासह मुंब्रा आणि कळवा येथील नागरिकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून ही घरे असून करोनाची लाट सुरू असताना त्यांना बेघर करणे योग्य नाही. ही घरे संरक्षित असल्यामुळे त्यांच्या योग्य पुनर्वसनासंदर्भात निर्णय होईपर्यंत नागरिकांना बेघर होऊ देणार नसल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंब्रामधील नागरिकांच्या भेटीदरम्यान सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airoli katai freeway opens journey will take ten minutes akp
First published on: 23-01-2022 at 00:50 IST