लोकसत्ता प्रतिनिधी ठाणे: खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीस योग्य वागणूक दिली नाही म्हणून सुप्रसिद्ध प्रशांत काॅर्नर या मिठाईच्या दुकानावर पालिकेने कारवाई केल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करणे धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांना महागात पडले आहे. अफवा पसरवून कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी प्रशांत काॅर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजय यांना मंगळवारी अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. ठाणे येथील पाचपाखाडी परिसरात सुप्रसिद्ध प्रशांत काॅर्नर हे मिठाईचे दुकान आहे. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना बसण्यासाठी दुकानाबाहेरील भागात एक कट्टा बांधण्यात आला होता. तसेच शेड उभारण्यात आली होती. हा कट्टा आणि शेड बेकायदा असल्याचे सांगत ठाणे महापालिकेच्या पथकाने त्यावर कारवाई केली होती. परंतु या दुकानाशेजारी असलेल्या इतर दुकानांसमोरही कट्टा आणि शेडचे बांधकाम करण्यात आलेले असून त्यावर मात्र कारवाई झालेली नव्हती. यामुळे समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत असतानाच, धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांनी समाजमाध्यमावर यासंबंधी केलेल्या संदेशामुळे खळबळ उडाली होती. हेही वाचा. तीन शहरांना एकच नगररचनाकार; अंबरनाथच्या नगररचनाकारावर बदलापूर, उल्हासनगरची जबाबदारी दुकानाबाहेर वाहन उभे करण्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांचे वाहनचालक आणि दुकानाचे सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाला. त्यानंतर दुकानात टोकन घेण्यावरूनही त्यांचा वाद झाला. त्यानंतर खरेदी न करताच त्या रागारागाने तडक दुकानाबाहेर निघून गेल्या. त्यानंतर, अवघ्या अर्ध्या तासात ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे कर्मचारी तिथे पोहोचले आणि त्यांनी थेट, ‘प्रशांत कॉर्नर’ दुकानाच्या बाहेरील शेड व इतर बांधकाम उध्वस्त केले, असा आरोप अजय जया यांनी केला होता. हेही वाचा. भिवंडीत ४१ किलो गांजा जप्त; दोघांना अटक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीला कोणतीही अपमानास्पद वागणूक मिळालेली नसताना आणि केवळ वाहन उभे करण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यवसान जर, अशपद्धतीने सुड उगावून होणार असेल तर, ठाणे शहरात नक्कीच ‘मोगलाई’ अवतरली आहे की काय? असेही त्यांनी संदेशात म्हटले होते. या आरोपामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या आरोपानंतर प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते. अजय यांनी केलेले सर्व आरोप निराधार, खोडसाळ असून अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दुकानावर जी कारवाई झाली, ती महापालिका स्तरावर झाली असून आजूबाजूच्या दुकानांवरही झाली आहे. परंतु या कारवाईबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांच्या नावाचे पत्रक काढून उल्लेख केला आहे, तो चुकीचा आहे. हेहा वाचा. डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा वाहतुकीला अडथळा वृषाली शिंदे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्या तर आमच्या दुकानात कधीही आलेल्या नाहीत, किंबहुना मी त्यांना ओळखतही नाही. माझ्या नावाचा आधार घेऊन या प्रकरणाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाचे नाव जोडून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असे त्यांनी म्हटले होते. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी मंगळवारी अजय यांना अटक केली. ठाणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.