ठाणे : मिरा भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मराठी भाषेच्या मुद्द्यावरून चोप दिल्यानंतर तेथील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. परंतु या घटनेनंतर आता मराठी -अमराठी वाद निर्माण होऊ लागला आहे. या घटनेनंतर ठाण्यात राहणाऱ्या अजय जेया या तरुणाने थेट मिरारोडमध्ये जाऊन मराठीचा जागर केला. तसेच जन्माने तमिळी असलो तरी, माझा जन्म येथे झाला आहे, म्हणून मी मराठी आहे, मराठी भाषा त्यांना नको असेल तर त्यांनी येथून निघून जावे असेही अजय म्हणाले.
गेल्याकाही दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यात मराठी अमराठी वाद उफाळून येत आहे. नुकतेच मिरा भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या वादातून एका व्यवसायिकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला होता. या घटनेनंतर तेथील व्यवसायिकांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळला आहे. त्यातच, एका व्यक्तीने ट्विटरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टॅग करुन मराठी बोलणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
ठाण्यात राहणाऱ्या अजय जेया हे मिरारोड भागात गेले. तिथे त्यांनी भोंग्याद्वारे उद्घोषणा करत नागरिकांशी संवाद साधला. अजय जेया म्हणाले की, ‘मी जन्माने तमिळी असलो तरी, माझा जन्म येथे झाला आहे, म्हणून मी मराठी आहे. माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे असे जेया म्हणाले. तसेच ते मराठी बोलणार नाही, शिकणार नाही. हे त्यांना दाखवून द्यायचे आहे, त्यांच्यामध्ये एक गुर्मी आहे.
आम्ही तुमच्यापेक्षा जास्त झालो आहोत, हे त्यांना दाखवायचे आहे. प्रयत्न त्यांचा तो आहे असा उल्लेख त्यांनी मराठी द्वेष करणाऱ्यांवर केला. तसेच मराठी ही फक्त भाषा नाही, तर ती आत्मा आहे असाही उल्लेख त्यांनी केला. मराहाष्ट्रात त्यांना मराठी नको असेल तर त्यांनी महाराष्ट्रातून निघून जावे असेही अजय जेया म्हणाले. यांच्या सवांदानंतर मराठी भाषिकांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले