scorecardresearch

अजिंक्य रहाणे डोंबिवलीतील त्याच्या शाळेत येऊन गेला, कोणाला पत्ताही नाही लागला; Video पोस्ट केल्यानंतर…

अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो डोंबिवलीमध्ये येऊन गेल्याचं अनेकांना समजलं.

Rahane in Dombivli
रहाणेच्या डोंबिवली भेटीची जोरदार चर्चा

मूळ डोंबिवलीकर रहिवासी असलेला क्रिकेटपटू अजिंक्य राहणे बुधवारी डोंबिवली शहरामध्ये त्याच्या मित्राकडे आला होता. या प्रवासामध्ये वाटेत शालेय शिक्षण घेतलेली स. वा. जोशी शाळा लागली. आपल्या शाळेला भेट देत अजिंक्यने पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासह जोशी शाळेच्या आवारात पाच मिनिट फेरफटका मारला. त्याने या भेटीचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्याच्या या भेटीबद्दल अनेकांना समजलं.

अजिंक्य हा जोशी शाळेचा माजी विद्यार्थी. जोशी शाळेच्या आवारात क्रीडा, संगीत विविध प्रकारचे वर्ग दररोज चालतात. या ठिकाणी विद्यार्थी पालकांची सतत वर्दळ असते. या गर्दीतून अजिंक्य पत्नी आणि मुलीसह जोशी शाळेच्या आवारात आला. जोशी शाळेतील जुने दिवस आठवत अजिंक्यने शाळेचे पटांगण इमारतीमध्ये पत्नीसह फेरफटका मारला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला नेहमीप्रमाणे पालक शाळेत आले आहेत असे वाटले. क्रिकेटपटू असलेला अजिंक्य रहाणे स. वा. जोशी शाळेचा माजी विद्यार्थी आहे, हे सुरक्षा रक्षकाला माहिती नसल्याने, इतर पालकांप्रमाणे त्याने अजिंक्यकडे पाहिले.

शाळेत येऊन गेल्यानंतर अजिंक्यने इंस्टाग्रामवर जोशी शाळेत मारलेला फेरफटका आणि त्या विषयीच्या आपल्या जुन्या आठवणींना भावनिक उजाळा दिला. अजिंक्यचा समाज माध्यमावरील मजकूर वाचून डोंबिवलीसह इतर भागातील अजिंक्यचे चहाते व रहिवाशांनी जोशी शाळेच्या संस्था पदाधिकाऱ्यांना संपर्क करून अजिंक्य कधी शाळेत आला होता. तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला का बोलावले नाही, असा प्रश्नांचा भडीमार करीत विचारणा सुरू केली. अजिंक्य शाळेत आल्याचे आम्हाला माहितीच नसल्याची उत्तरे पदाधिकाऱ्यांनी संपर्क करणाऱ्याना दिली.

पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना संपर्क करून अजिंक्य कधी शाळेत आला होता अशीही विचारणा केली. डोंबिवलीतील क्रिकेट प्रशिक्षण देणाऱ्या क्रीडा संस्थांनीही अजिंक्य डोंबिवलीत आला होता त्याने किमान आम्हाला संपर्क तरी करायचा होता, असे सांगितले.

शाळेच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाने अजिंक्य रहाणेला क्रिकेटपटू म्हणून ओळखले असते तर त्याने ही माहिती तात्काळ संस्था पदाधिकाऱ्यांनी दिली असती. पदाधिकाऱ्यांनी तात्काळ शाळेत येऊन शाळेचा एक माजी विद्यार्थी म्हणून अजिंक्य आणि कुटुंबियांचे स्वागत केले असते. सुरक्षा रक्षक अजिंक्य रहाणेला ओळखू शकला नाही. त्यामुळे ही गडबड झाल्याची माहिती एका संस्था पदाधिकाऱ्याने दिली.

एक लॉंग ड्राईव्ह म्हणून आम्ही डोंबिवली आलो होतो. त्या वेळी मुलीला बाबांची शाळा दाखवण्यासाठी त्यांच्या जुन्या शाळेत घेऊन गेलो होतो. बाकी डोंबिवलीत येण्याचे कोणतेही कारण नव्हते, अशी माहिती अजिंक्यच्या कुटुंबीयांनी त्यांच्या डोंबिवलीतील एका साथीला दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2022 at 15:11 IST
ताज्या बातम्या