ठाणे – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाल्याने राज्यभर शोक व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांकडून शोक सभांचे आयोजन करण्याबरोबरच कार्यालयात त्यांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात येत आहेत. अशाचप्रकारे ठाणे येथील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कार्यालयात अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. यावेळी पक्ष विभाजनानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, माजी खासदार आनंद परांजपे हे तिघे एकत्र येऊन त्यांचे मनोमिलन झाल्याचे चित्र दिसून आले.

राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणूक प्रचारसाठी नेते ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. अशाचप्रकारे निवडणुक प्रचारासाठी अजित पवार हे बुधवारी सकाळी विमानाने बारामतीला निघाले. बारामतीमध्ये विमान धावपट्टीवर उतरत होत असतानाच, विमानामध्ये तांत्रिक बिघाड होऊन अपघात झाला. या अपघातात अजित पवार, विदीप जाधव (खासगी सुरक्षारक्षक), सुमित कपूर (पायलट कॅप्टन), संभवी पाठक (कॅप्टन) आणि पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभर शोककळा पसरली.

अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक तसेच सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वाचा एक भक्कम आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने कार्यकर्ते तसेच समर्थकांमध्ये मोठे दुःख व्यक्त केले जात असून अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अशाचप्रकारे सोमवारी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष कार्यालयात अजित पवार यांचा अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. हा कलश पाहून माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला होता.

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जाऊन भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनीही राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जाऊन अस्थीचे दर्शन घेतले. पक्ष विभाजनानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, माजी खासदार आनंद परांजपे हे तिघे एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांशी चर्चा केली.

अजित पवार यांच्या अस्थी कलश दर्शनाच्या निमित्ताने पक्ष विभाजनानंतर या तिन्ही नेत्यांचे एकप्रकारे मनोमिलन झाल्याचे चित्र दिसून आले.

आमदार जितेंद्र आव्हाड आणि नगरसेवक नजीब मुल्ला ही गुरू शिष्याची जोडी म्हणून ठाणे जिल्ह्यात ओळखी जायची. काही वर्षांपुर्वी दोघांमध्ये बिनसले. त्यातच राष्ट्रवादी पक्ष विभाजानंतर आव्हाड यांनी शरद पवार यांची तर, मुल्ला यांनी अजित पवार यांची साथ दिली. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्याविरोधात निवडणुक लढविली होती. त्यात त्यांचा आव्हाडांनी पराभव केला होता. हे दोन्ही नेते एकमेकांवर टोकाची टिका करताना आणि कुरघोडीचे राजकारण करताना दिसून आले. परंतु अजित पवार यांच्या अस्थी कलश दर्शनावेळी भावूक झालेले आव्हाड आणि मुल्ला या दोघांनी एकमेकांना मिठी मारत शोकभावना व्यक्त केली आणि यानिमित्ताने त्यांच्यातील दुरावाही कमी झाल्याचे दिसून आले.