ठाणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले असून या घटनेमुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. सोमवारी अजित पवार यांचा अस्थी कलश ठाणे पक्ष कार्यालयात आणण्यात आला. हा कलश पाहून माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला

राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. या निवडणूक प्रचारसाठी अजित पवार हे बुधवारी सकाळी बारामतीला विमानाने निघाले. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच, विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघात झाला. या अजित पवार, विदीप जाधव (खासगी सुरक्षारक्षक), सुमित कपूर (पायलट कॅप्टन), संभवी पाठक (कॅप्टन) आणि पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) यांचा मृत्यू झाला.

अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक तसेच सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वाचा एक भक्कम आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने कार्यकर्ते तसेच समर्थकांमध्ये मोठे दुःख व्यक्त केले जात असून अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे.

अजित पवार यांचे अस्थी कलश सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर (जिल्हा) मध्यवर्ती कार्यालयात आणण्यात आला. माजी खासदार आनंद परांजपे हे अजित पवार यांचा अस्थी कलश घेऊन आले. त्यावेळी भावूक होऊन त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी पक्षाचे नेते प्रमोद हिंदुराव, भाजप आमदार निरंजन डावखरे तसेच इतर जिल्हा पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परांजपे यांच्या हातातील अजित पवार यांचा अस्थिकलश पाहून कार्यकर्त्यांचा अश्रूचा बांध फुटला. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उपस्थित राहून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच माजी खासदार आनंद परांजपे यांनीही भावपूर्ण शोकसंदेश व्यक्त करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली आहे.