ठाणे : महाड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून डाॅ. बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जितेंद्र आव्हाड हे डाॅक्टर जितेंद्र आव्हाड नसून ते नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र त्यांनी फाडून टाकले. त्यामुळे त्यांच्या मनात परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आले. मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी करते. कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यपुस्तकात येणार नाहीत ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. पण ज्यांना नाटक करायची सवय आहे. ते आंदोलन करायला महाडला गेले आणि आंदोलन करायच्या भरामध्ये त्यांनी डाॅ. बाबासाहेबांचा अवमान केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी महाड येथील पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतरांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे असे परांजपे म्हणाले. स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि असे कृत्य करायचे हे शोभनीय नाही. आज त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली. तत्पूर्वी आव्हाड यांच्याविरोधात अजित पवार गटाने आंदोलन करत त्यांचा निषेध व्यक्त केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar group demands chief minister eknath shinde to file a criminal case and arrest him for insulting dr babasaheb ambedkar amy
First published on: 29-05-2024 at 18:03 IST