ठाणे : दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना पुर्ण झाला असून या अपघाता संदर्भात रोहित पवार हे दररोज प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी करत आहेत. त्यावर आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातातील तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास करून योग्य ती नोंद घेऊन कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तरीही रोहीत पवार हे राजकारण करीत आहेत, अशी आरोप परांजपे यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला आहे. तरीदेखील माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना या घटनेवर विश्वास ठेवणे आजही कठीण जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे, विकासाला प्राधान्य देणारे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे असे नेतृत्व आपण गमावले, ही वेदना अजूनही ताजी आहे. परंतु या दुःखद घटनेनंतर आमदार रोहित पवार यांच्याकडून होत असलेले आरोप आणि राजकारण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे नाही, असे परांजपे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून स्पष्ट भूमिका आहे की या अपघाताची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे आणि सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले पाहिजे. अपघात झालेल्या दिवशीच केंद्रीय नागरी उड्डाण विभागामार्फत चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्ली येथे जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली. त्यावेळी तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास करून योग्य ती नोंद आणि कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तरीही रोहित पवार यांच्याकडून तक्रार नोंदिविण्यासाठी मुंबईत आणि बारामतीमधील पोलीस ठाण्यात तमाशे करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.

काही माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ दाखवून किंवा अपूर्ण माहिती पसरवून पक्षातील चार नेत्यांवर आरोप करण्यात येत आहेत. जय पवार यांचा पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीतील एक व्हिडीओ दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. ते मागच्या रांगेत बसत होते. त्यामुळे त्यांना पहिल्या रांगेत बसण्यास सांगण्यात येत होते. परंतु ते चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले. अशा प्रकारचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत, असे परांजपे म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे की २ जुलै २०२३ नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीतही अजित पवारांनी कुटुंब आणि पक्ष एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात विविध राजकीय वक्तव्ये झाली, त्यांना कुटूंबाने एकटे पाडण्याचा प्रयत्न केला, हे संपुर्ण राज्याने पाहिले आणि तशी खंत अजित पवार यांनी व्यक्तही केली होती, असे परांजपे म्हणाले.

आमची आणि महाराष्ट्रातील जनतेची एकच अपेक्षा आहे की या अपघाताचे नेमके कारण काय होते, कोणती तांत्रिक अडचण होती का, याचा किमान प्राथमिक अहवाल तरी लवकरात लवकर जनतेसमोर यावा. सत्य बाहेर आले पाहिजे आणि कोणतीही शंका उरू नये, हीच सर्वांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पक्ष एकसंघ असून विलनीकरणाबाबत अद्याप आमच्याकडे काहीच विषय नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे परांजपे म्हणाले.