पंडित नेहरूंनी सांगितल्याप्रमाणे सहिष्णू असणं हीच भारतीय असण्याची खूण आहे. आपला सगळा सांस्कृतिक इतिहास हा धर्म, भाषा आणि संस्कृती संकराने भरलेला आहे. असे असताना आता वाढत्या असहिष्णुतेबद्दल बोलण्याची वेळ का आली, याचा विचार करण्याची गरज असून सध्याच्या महाराष्ट्राला खरंच पुरोगामी म्हणायचं का असा प्रश्न पडला तर नवल नाही, असे प्रतिपादन कवयित्री नीरजा यांनी केले. डोंबिवलीतील पु. भा. भावे साहित्यनगरीत सुरू असलेल्या साहित्य संमेलनात ‘पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता’ या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या. शनिवारी येथील डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात प्रा. बालकृष्ण कवठेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात नीरजा यांच्यासह प्रा. राजेंद्र दास, राकेश वानखेडे हेही सहभागी झाले होते, चांगदेव काळे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी बोलताना नीरजा यांनी महाराष्ट्रातील संतपरंपरेपासून ते एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन पर्वाचा उल्लेख करत महाराष्ट्रातील सध्याच्या असहिष्णुतेच्या वातावरणावर भाष्य केले. याविषयी त्या पुढे म्हणाल्या की, सध्या सर्वत्र विचार करण्याची शक्तीच खुंटलेली माणसं आजूबाजूला दिसत राहतात. विचारापेक्षा भावनेला महत्त्व देणाऱ्यांचे प्रमाण आपल्याकडे वाढत चालले आहे. विचार पटला नाहीतर तुमच्या विचारावरही बंदूक रोखून धरण्याच्या या काळात असहिष्णुता हा भारताचा स्वभाव नाही, हे सर्वाना सतत सांगण्याची आवश्यकता असल्याचेही त्या म्हणाल्या.

परिसंवादातील इतर वक्त्यांनीही समकालीन घटनांची उदाहरणे देत असहिष्णू प्रवृत्तीवर नेमकेपणाने बोट ठेवले. परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. कवठेकर यांनी असहिष्णुतेविषयीच्या चर्चेवर आपली निरीक्षणे मांडली. नव्वदच्या दशकानंतर जातीय अस्मिता व असहिष्णू प्रवृत्ती अधिक तीव्र झाली असून हा प्रश्न सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन वातावरणाशी निगडित असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रात एकही वाद वैचारिक पातळीवरून लढवला गेला आहे का, असा प्रश्न उपस्थित करून ते पुढे म्हणाले की, राम गणेश गडकरींचा पुतळा फोडला जातो, परंतु तरीही त्यावर समाजातून चकार शब्दही काढला जात नाही. उलट सौम्यपणे जातीय अस्मितेवर फुंकर घालणारी वक्तव्ये सध्या ‘जाणत्या’ म्हणवल्या जाणाऱ्यांकडून केली जात आहेत. त्यामुळे असहिष्णू प्रवृत्तींपेक्षाही स्वत:ला डावे, उदारमतवादी समजणाऱ्यांकडून होणारा सोयीस्कर सहिष्णुतेचा आविष्कार हाच अधिक धोकादायक  असल्याचेही ते यावेळी म्हणाले.