फेर‘फटका’ : यंदा स्वागताध्यक्षपद कुणाकडे?

साहित्य संमेलन ज्या शहरात होते, त्या शहरातील महापालिका हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत असते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान डोंबिवली शहराला मिळाला आहे. साहित्य संमेलन म्हटले की, त्याआधी वादविवाद आणि चर्चा यांना उधाण येते. सध्याही तसेच काहीसे वातावरण रंगू लागले आहे.

साहित्य संमेलन म्हटले की, मग अध्यक्ष कोण? स्वागताध्यक्ष कोण? यावरून अनेक तर्कवितर्क सुरू होतात. डोंबिवलीतील साहित्य संमेलनासाठी स्वागताध्यक्ष कोण होणार याबाबत साहित्यप्रेमींमध्ये तसेच शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र ज्या शहरात साहित्य संमेलन होते, त्या शहराच्या प्रथम नागरिकाला म्हणजेच महापौरांना स्वागताध्यक्षाचा मान मिळाला पाहिजे असे संकेत आहेत. ८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात झाले तेव्हाही ठाण्याचे तत्कालीन महापौर अशोक वैती यांना या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षाचा मान मिळाला होता. त्याचप्रमाणे १९८२ मध्ये ठाण्यात झालेल्या संमेलनातही तत्कालीन महापौर वसंत डावखरे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले होते. त्यामुळे जर या संकेतानुसार जर शहरातील प्रथम नागरिकाला हा मान द्यायचे ठरविले तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना मिळावा अशी चर्चा आहे.

साहित्य संमेलन ज्या शहरात होते, त्या शहरातील महापालिका हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत असते. त्याचप्रमाणे सर्व शहरात या संमेलनाची वातावरण निर्मिती होत असते. सध्या या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव वझे यांची नावे चर्चेत आहेत. परंतु फेब्रुवारी महिन्यात ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे स्वागताध्यक्षपदही पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी भूषविले होते. त्यामुळे आताही या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे या शहराचे खासदार आहेत. तसेच तरुण असल्यामुळे स्वागताध्यक्षपदासाठी त्यांच्याही नावाची चर्चा ऐकायला मिळते. संमेलनासाठी होणाऱ्या खर्चाला आर्थिक पाठबळाचीही नितांत आवश्यकता असते. त्यामुळे या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे लवकरच पाहायला मिळणार आहे.

नुकत्याच ठाण्यात झालेल्या नाटय़संमेलनाची वातावरणनिर्मिती व्हावी यासाठी नाटय़संमेलनाच्या आठवडाभर आधी शहरातील विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलन हे शहरातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहचले पाहिजे यासाठी सर्वचजण नियोजनाला लागले आहे. ठाण्यातही संमेलनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केल्यास ठाणेकर नागरिकही या संमेलनाला डोंबिवलीत हजेरी लावतील यात शंका नाही.

ठाण्यात झालेल्या ८४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दरम्यान वाडा, जव्हार या ठिकाणी एकदिवसीय संमेलने आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे हे संमेलन संपूर्ण जिल्ह्यात पोहचले होते. आता जरी जिल्ह्याचे विभाजन झाले असले तरी त्याच धर्तीवर डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांनीही ठाणे उल्हासनगर, बदलापूर, मीरा भाईंदर या शहरातही या संमेलनाच्या निमित्ताने एकदिवसीय कार्यक्रम आयोजित केले तर हे संमेलन निश्चितच सर्वाच्या लक्षात राहील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akhil bharatiya marathi sahitya sammelan guest president issue in thane

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या