कल्याण : राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती विचारात घेऊन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीतर्फे मराठी बाणा या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला दोन लाख ५१ हजार रूपयांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय समितीने घेतला. हा निधी समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला.

मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या निधीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. दुष्काळात होरपळत असलेले शेतकरी हे आपल्याच कुटुंबातील एक घटक आहेत. त्यामुळे त्यांना साहाय्य करण्यासाठी अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीने घेतलेला पुढाकार सामाजिक भान ठेवणारा आणि कौतुकास्पद आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती पदाधिकाऱ्यांच्या या कृतीबद्दल समाधान व्यक्त केले.

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सातत्याने विविध लोकोपयोगी आणि कल्याणकारी उपक्रम राबवत असते. राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, बाधित शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने समितीने ”मराठी बाणा” या भव्य सांस्कृतिक महाराष्ट्राच्या दैदीप्यमान आणि समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या धर्मादाय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमातून जमा होणारा संपूर्ण निधी शेतकऱ्यांना मदत देण्याचा संकल्प समितीने केला होता. त्याप्रमाणे समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक, सरचिटणीस अर्जुन डोमाडे, खजिनदार रामनाथ दौंड आणि उपाध्यक्ष आत्माराम फड उपस्थित होते. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आणि सामाजिक दातृत्वाबद्दल अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.