ठाणे : रक्षाबंधनाच्या निमित्ताने वनशक्ती संस्थेच्या वतीने पर्यावरणपूरक राखी निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वर्तकनगर येथीलद. ल. मराठे प्राथमिक शाळेत झालेल्या या कार्यशाळेत २१४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी या राख्या झाडांना बांधून ‘वृक्षबंधन’ उपक्रमही राबविला आणि त्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

प्लास्टिक, कृत्रिम सजावटीचे साहित्य व रासायनिक घटकांपासून तयार होणाऱ्या राख्यांमुळे निर्माण होणारा कचरा टाळण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वनशक्तीच्या प्रकल्प अधिकारी चित्रा म्हस्के आणि फिरदौस खान यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक राखी तयार करण्याची पद्धत तसेच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ हस्तकलेचा अनुभव मिळाला नाही, तर सण साजरे करतानाही पर्यावरणाचे भान कसे ठेवावे, याचा संदेश देण्यात आला. राखीच्या धाग्याने बहीण-भावाचे नाते दृढ करण्यासोबतच झाडांशीही नाते जोडण्याचा अनोखा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

पर्यावरणपूरक राखी आणि वृक्षबंधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम, जबाबदारी व संवेदनशीलता निर्माण करण्याचा वनशक्तीचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. सण साजरे करताना निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यास या उपक्रमामुळे मदत झाली. -जयश्री मोहिते, मुख्याध्यापक, द. ल. मराठे प्राथमिक शाळा