ठाणे: साडेतीन मुहूर्तांपैकी एक महूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. वैशाख शुक्ल तृतीयेला हा दिवस साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे हा दिवस खूप शुभ मानला जातो. परंतू, या दिवसाला अक्षय्य तृतीया हे नाव कसे पडले हे माहित आहे का ? त्यामागील इतिहास खगोलशास्त्रज्ञ आणि पंचागकर्ते दा.कृ सोमण यांनी उलगडला आहे.
साडेतीन मुर्हुतांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. खगोलशास्त्रज्ञ दा.कृ सोमण यांच्या मते अक्षय्य तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसरी तिथी असून या दिवशी सूर्य आणि चंद्र हे त्यांच्या ग्रहस्थानी सर्वोत्तम असते. या दिवशी घेतलेले सोने हे शुभ आणि यशस्वी गुणवत्तेची सुरुवात मानली जाते. यावर्षी रविवार, १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीया हा सण आला आहे.
रविवारी सकाळी १० वाजून ४९ मिनिटांनी वैशाख शुक्ल तृतीया सुरू होत आहे. तर, सोमवार, २० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी वैशाख शुक्ल तृतीया संपत आहे. त्यानुसार रविवारी सकाळी १०.४९ पासून ते दुपारी १२.३८ हा कालावधी शुभ असल्याचे सोमण यांनी सांगितले.
या सणाला अक्षय्य तृतीया नाव पडण्यामागचे कारण हे ‘मदनरत्न’ या ग्रंथातून उलगडते असे सोमण सांगतात.
अस्यां तिथौ क्षयमुपैति हृतं न दत्तं ।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ॥
या श्लोका द्वारे श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले होते. याचा अर्थ असा की, या तिथिस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही. त्यामुळे या तृतीयेस मुनीनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले जाते.
‘अक्षय्य’ नावामागचा अर्थ सांगणारी पौराणिक कथा…
प्राचीन काली शाकल नगरात धर्म नावाचा एक व्यापारी राहत होता. तो रोज ईश्वराची पूजा करीत असे. तसेच तो नेहमी सत्य बोलत असे. एके दिवशी एका विद्वानाने त्याला अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य सांगितले. ते ऐकून तो प्रभावित झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्याने नदीवर जाऊन स्नान केले. ईश्वराची पूजा केली. पूर्वजांचे स्मरण केले. नंतर त्याने पाण्याने भरलेल्या घटाचे ( मातीच्या भांड्याचे ) दान केले. अशारितीने त्याने आपला उपक्रम नित्यनेमाने चालू ठेवला. प्रत्येक अक्षय्य तृतीयेला तो दान करू लागला. त्याला जीवनात कशाचीही कमतरता पडली नाही. त्याला जीवनात अक्षय आनंदाची प्राप्ती झाली. या कथेमागचा हेतू अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केले तर अक्षय सुखसमाधानाची प्राप्ती होते असा आहे.
