निर्बधांचा मद्यविक्रेत्यांकडून गैरफायदा
किशोर कोकणे
ठाणे : संभाव्य तिसरी लाट आणि करोना उत्परिवर्तित विषाणूच्या (डेल्टा प्लस) प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत. या र्निबधांचा गैरफायदा घेत ठाणे जिल्ह्य़ातील काही मद्यविक्रेत्यांनी चढय़ा दराने मद्यविक्री सुरू केली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे या प्रकारांकडे दुर्लक्ष होत आहे. मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये सायंकाळी चारनंतर मद्याच्या एका बाटलीमागे ग्राहकांची १० ते ५० रुपयांचे जादा दर आकारले जात आहेत. अनेकदा ठरवून दिलेल्या वेळेत ग्राहकांकडून मद्य खरेदी होत नाही. अशा वेळी चारनंतर खरेदीसाठी जाणाऱ्या अथवा मद्य मागविणाऱ्या ग्राहकांना मन मानेल त्या पद्धतीने चढे दर आकारले जात आहेत. काही ठिकाणी घरपोच शुल्क तर उशिराने मद्य खरेदी करत असल्यामुळे हे दर आकारले जात असल्याचे कारणही विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.
ठाणे जिल्ह्य़ात ४५० मद्याची दुकाने आणि १३०० रेस्टॉरंट आहेत. राज्य सरकारच्या र्निबधांनुसार रेस्टॉरंट आणि मद्य विक्रीच्या दुकानदारांना सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत मद्यविक्री करण्यास परवानगी आहे. तर सायंकाळी ४ नंतर दुकाने बंद करून घरपोच सेवा किंवा पार्सल सुविधा देणे बंधनकारक आहे. साधारणपणे बार आणि रेस्टॉरंटमधील ग्राहक हा सायंकाळी तसेच रात्रीच्या वेळेतील अधिक असतो. मद्य खरेदीचे प्रमाणही एरवी याच काळात अधिक होत असते. र्निबधांची वेळ सायंकाळची असल्याने रेस्टॉरंट खुले ठेवता येत नाही. त्यामुळे जिल्ह्य़ातील अनेक रेस्टॉरंट अद्यापही बंद आहेत. रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या मद्य ग्राहकांचा भार आता मद्याच्या दुकानांवर आलेला आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या या र्निबधांचा गैरफायदा घेत सायंकाळी चारनंतर मद्यविक्रेत्या दुकानदारांनी मद्याच्या बाटलीवरील छापील किमतीच्या १० ते ५० रुपये जादा आकारणी करण्यास सुरुवात केली आहे. निर्बंधाचे कारण देत ही लूट मद्य विक्रेत्यांकडून सुरू आहे. छापील किमतीपेक्षा जादा दराने मद्याची विक्री होत असताना या दुकानदारांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. १०० ते २०० रुपयांच्या मद्य बाटलीमागे १० रुपये, २०० हून अधिक रुपयांवरील मद्याच्या बाटलीमागे सुमारे ४० रुपये आणि ५०० किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या मद्याच्या बाटलीमागे ५० रुपयांची लूट सुरू आहे.
दुर्लक्षामुळे ग्राहकांना जादा दराने मद्य खरेदी करावे लागत आहे, असे एका ग्राहकाने सांगितले. घरपोच सेवा देतानाही लूट सुरू केली आहे. एखाद्या ग्राहकाने दुकानापासून ५०० मीटर अंतरावर घरपोच मद्य मागितल्यास त्याच्याकडून घरपोच सेवेच्या मागे २० ते ३० रुपये घेतले जात आहे. तसेच छापील किमतीपेक्षाही अधिक दराने मद्य खरेदी करावे लागते. मद्याच्या दुकानापासून अंतर जितके लांब तितके घरपोच सेवा देण्याची रक्कम अधिक असे एका मद्य ग्राहकाने सांगितले. निर्बंध मद्यविक्रेत्यांच्या आर्थिक फायद्यासाठी लागू केले आहेत का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे.
जिल्ह्य़ात विविध ठिकाणी कारवाईसाठी पथके पाठविली जातात. छापील किमतीपेक्षा अधिक दराने दुकानात मद्याची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.
– नितीन घुले, अधीक्षक, ठाणे विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग.
अंतर नियमांचे उल्लंघन
अनेक मद्यविक्रेत्यांच्या दुकानांबाहेर अंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र आहे. भाजीविक्रेत्यांच्या दुकानावर कारवाई होते. मद्याच्या दुकानाबाहेरही रांगा लागल्या तरी मद्यविक्रेत्याविरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे येथील एका रहिवाशाने सांगितले.
