निवडणुकांच्या तोंडावर अंबरनाथ, बदलापुरात महिलांना प्रलोभने

अंबरनाथ : अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून सोन्याची नथ, मोबाइल, पैठणी आणि गृहोपयोगी वस्तू वाटपाची खैरात सुरू केली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने सुरू झालेली ही खैरात अजूनही सुरू असून विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनीही असा खर्च करण्यास सुरुवात केली आहे.

अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. निवडणुकीपूर्वी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने जवळपास सर्वच मतदारसंघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह सर्वपक्षीय इच्छुकही तयारीला लागले आहेत. निवडणूक काळात प्रचारासाठी खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आलेली असते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मतदारांना आकर्षित करण्यासाठी विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी आश्वासन, भेटवस्तू आणि कार्यक्रमांची जंत्री लावली आहे.

महिला दिनाच्या नावाखाली अंबरनाथ, बदलापूरमध्ये महिलांना आकर्षित करण्यासाठी विविध खेळ, होम मिनिस्टरसारखे कार्यक्रम, प्रश्नमंजूषा, पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथमध्ये एका इच्छुकाने चक्क ५० सोन्याच्या नथ, ५० स्मार्ट मोबाइल फोन आणि इतर अनेक गृहोपयोगी वस्तू विविध स्पर्धाच्या माध्यमातून महिलांना वाटल्या, तर बदलापुरात एका कार्यक्रमात इच्छुकाने इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि भांडय़ांचे वाटप केले.

शहरातील विविध भागांत पार पडलेल्या इतर कार्यक्रमांमध्ये शेकडो साडय़ा, भांडी, बनावट दागिन्यांचे वाटप करण्यात आले. अशा कार्यक्रमांची मालिका अजूनही सुरूच आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महिलांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांनी असे कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.

विकासकामे पडली मागे

निवडणुकांच्या तोंडावर विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांकडून मतदारांना प्रलोभने दिली जात असून यामुळे यंदाची निवडणूक विकासकामांऐवजी प्रलोभनांद्वारे लढली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक पराभूत उमेदवारांनी विविध कामांतून आपला जनसंपर्क टिकवला होता. मात्र अशाप्रकारे पैशांची उधळपट्टी होणार असेल तर त्याला तोंड कसे द्यायचे, असा प्रश्न या इच्छुकांपुढे उभा राहिला आहे.