scorecardresearch

राज्याचा सर्वांगीण विकास हाच शिवसेना-भाजपचा अजेंडा, डोंबिवलीत स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

डोंबिवलीतील गणपती मंदिरातील गणेशाचे दर्शन आणि स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सकाळी आले होते.

cm eknath shinde
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: आपल्या सांस्कृतिक परंपरा जतन होण्यासाठी निर्बंध मुक्त सण, उत्सव उत्साहाने साजरे झाले पाहिजेत. नववर्ष स्वागत यात्रेच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यांवरुन उत्साह, आनंद ओसंडून वाहत आहे. याचे खूप समाधान आहे. शिवसेना-भाजपचा कोणताही व्यक्तिगत, छुपा अजेंडा नाही. राज्याचा सर्वांगीण विकास आणि सामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल हाच आमचा अजेंडा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित २५ व्या नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने केले.

डोंबिवलीतील गणपती मंदिरातील गणेशाचे दर्शन आणि स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सकाळी आले होते. इंदिरा चौक ते गणेश मंदिर दरम्यान मुख्यमंत्री स्वागत यात्रेत पायी चालले. लोकांशी संवाद साधला.

स्वागत यात्रेच्या माध्यमातून लोक आनंदाने रस्त्यावर उतरली आहेत. निर्बंधमुक्त सण, उत्सव साजरे केले तर लोक त्याचा आनंद घेतात. हे स्वागत यात्रेतून दिसून येते. म्हणून शिवसेना-भाजपचे सरकार गेल्या वर्षी सत्तारुढ होताच सण, उत्सव साजरे करणाऱ्यावरील निर्बंध पहिले हटविले. त्याची प्रचिती आता लोक घेत आहेत. संस्कृती, परंपरा टिकण्यासाठी सण, उत्सव महत्वाचे आहेत. विकासा बरोबर सांस्कृतिक भूक महत्वाची आहे. शिवसेना-भाजपचा कोणताही छुपा अजेंडा नाही. सामान्यांचा, राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा- Gudhi Padva 2023: “गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा” म्हणत मुख्यमंत्र्यांनी सांगितला नव्या वर्षाचा संकल्प; म्हणाले…!

राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ मिळत आहे. हे डबल इंजिन सरकार सामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून आणणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वांच्या उन्नत्तीचा आहे. मराठी, हिंदी कलाकारांच्या पाठीशी हे सरकार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. डोंबिवलीतील नागरिक खूप प्रेमळ आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे या भागात पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले, त्यावेळेपासून डोंबिवलीतील नागरिकांनी जी साथ दिली, प्रेम दिले ते कधीही विसरणार नाही, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मागील आठ महिन्याच्या कालावधीत आमच्या सरकारने राज्याच्या विकासाचे धाडसी आणि जलद निर्णय घेतले. अशाप्रकारचे निर्णय घेणारे हे देशातील पहिले राज्य आणि सरकार आहे. असे धडाकेबाज निर्णय घेऊन राज्य प्रगतीपथावर नेण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा- डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेत पर्यावरणाचा जागर

डोंबिवलीतील गणेश मंदिराकडून धार्मिक कार्यक्रमांबरोबर अनेक सामाजिक, लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. मंदिराचा शतकोत्त्तर महोत्सव सुरू होत आहे. गणपत्ती बाप्पाच्या आशीर्वादामुळे आपले सरकार आहे. त्यामळे मंदिर संस्थानला काही कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. प्रमोद पाटील, आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, मंदिराच्या अध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त राहुल दामले, प्रवीण दुधे, मेघराज तुपांगे उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 14:43 IST

संबंधित बातम्या