ठाणे : राज्यातील शहरांच्या विकासाबरोबरच रस्ते जोडणीची कामे करणे गरजेचे असून यामु‌ळेच समृद्धी महामार्गाबरोबरच मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो आणि विविध रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांचा फायदा नागरिकांबरोबरच बांधकाम क्षेत्राला होणार आहे. हे सरकार सर्वसामन्यांचे असल्याने अशाप्रकारचे जनहिताचे निर्णय घेत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यातील मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना केले. राज्याचा नगरविकास मंत्री असताना बांधकाम क्षेत्राला आवश्यक असलेल्या सवलती देण्याचे काम केले आणि त्यामुळेच बांधकाम व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी चांगली आणि वेळेत घरे बनवली तर त्याचा फायदा लोकांना होईल. त्यामुळेच सवलतीचे निर्णय घेतले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक १ येथील रेमंड कंपनीच्या मैदानात क्रेडाई एमसीएमचआयच्या वतीने मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात आले असून, या प्रदर्शनाला मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी भेट देऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. कुणाला छोटे तर कुणाला मोठे घर हवे असते. घराजवळचे वातावरण चांगले हवे असते. पण, प्रत्येकाच्या आर्थिक मर्यादा असतात आणि तो आपल्या आवक्यानुसार घर खरेदी करतो. म्हणूनच शहरात परवडणारी, मध्यम आणि मोठी अशी तिन्ही प्रकारची घरे बनविण्याबाबत आम्ही सांगतो. त्यामुळे प्रत्येकाला घर घेणे शक्य होईल आणि त्याचा फायदा बांधकाम क्षेत्रालाही होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – ठाण्यातील गांधीनगर पूलाचे काम सहा वर्षांपासून रखडले; अपूर्ण कामामुळे पोखरण-२ मार्गावर होतेय वाहतूक कोंडी

नगरविकास मंत्री असताना एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली (युनीफाइड डिसीआर) तयार केली. ही नियमावली तयार करताना बांधकाम संघटनांशी चर्चा केली. त्यावेळी बांधकाम व्यवसायिकांचे हित जपतो म्हणून माझ्यावर टिका होत होती. परंतु, या क्षेत्रातील नेमक्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याकरीता तशी नियमावली करणे गरजेचे होते. नियमावली केवळ कागदावर राहू नये आणि त्याच्या अंमलबजावणीचा फायदा नागरिक, तसेच बांधकाम क्षेत्राला व्हावा यासाठी बांधकाम संघटनेशी चर्चा केली. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून बांधकाम क्षेत्राकडे पाहिले जाते आणि त्यामुळेच या क्षेत्राला सवलती देण्याचे काम केले, असेही शिंदे म्हणाले.

शहरांच्या विकासाबरोबरच रस्ते जोडणीची कामे करणे गरजेचे असून यामुळेच नागपूर-मुंबई, वसई-विरार कॅरीडोअर, ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग, तसेच इतर प्रकल्पांची कामे राज्य सरकार करीत आहे. मुंबई फ्री-वे हा मार्ग थेट घोडबंदर येथील फाउंटन हाॅटेलजवळील चौकातील पुलाला जोडण्यात येणार आहे. शिवडी-न्हावाशिवा ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते रायगड असा थेट प्रवास करणे शक्य होणार असून, हा रस्ता मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा या मार्गांनाही जोडण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, तेव्हा मुंबईत मेट्रोची कामे वेगाने सुरू होती. पण, अडीच वर्षे कामे बंद होती. आता आमचे सरकार येताच आम्ही सर्व बंद कामे सुरू केली, असेही शिंदे यांनी सांगितले. मागील सरकारने उद्योगांना सवलती दिल्या नाहीत आणि त्यामुळे ते राज्याबाहेर गेले. या कंपन्यांनाही माहित नव्हते की सरकार बदलणार आहे. आता आमचे सरकार आल्यानंतर उद्योगांना सवलती देण्यात येत असून यामुळेच दावोसमध्ये अनेक कंपन्यांसोबत करार झाले आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – डोंबिवलीत कुंभारखाणपाडा खाडी किनारी हरित पट्ट्यात २५० घरांचा बेकायदा गृहप्रकल्प

गेल्या २० वर्षांपासून मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमाला येतो आहे. तेव्हा मी जसा होतो, तसाच आजही आहे. माझ्यात कोणताही बदल झालेला नाही आणि बदल होणारही नाही. माझ्यात बदल झाला तर उद्या तुम्हीच म्हणाल की एकनाथ शिंदे हे बदलले. पण तसे होणार नाही. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे. माझ्या कामाची हीच पद्धत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Along with the development of cities road connectivity is necessary says chief minister eknath shinde in thane ssb
First published on: 06-02-2023 at 16:16 IST