ठाणे : कालबाह्य आणि मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते बाजारात विक्रीसाठी पाठविल्याप्रकरणी ॲमेझॉन कंपनीच्या व्यवस्थापकासह दोनजणांवर कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून त्यापाठोपाठ ॲमेझॉनच्या या गोदामचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने केली आहे. त्यामुळे या गोदामातून अन्न पदार्थ आता विक्रीसाठी पाठविण्यास बंदी असणार आहे.
भिवंडी येथील सरलगाव परिसरातील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे गोदाम आहे. या गोदामात २४ जून २०२६ रोजी ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर आणि त्यांच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. या तपासणीदरम्यान गोदामात मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारा सुमारे १.५ टन मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. तसेच, यापूर्वी गोदामातील मुदतबाह्य अन्नपदार्थ कोठे आणि कसे नष्ट केले, याचा कोणताही अधिकृत पुरावा किंवा तांत्रिक नोंद कंपनीला सादर करता आली नाही, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली.
काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी शहरातील आठ ठिकाणी कारवाई करून ४५.७४ लाख रुपयांचा मुदतबाह्य अन्नसाठा जप्त केला होता. जो थेट ग्राहकांना विकला जात होता. प्रशासनाच्या सखोल चौकशीत, बाजारपेठेत आढळलेल्या या छुप्या आणि घातक साठ्याचा पुरवठा साखळीचा संबंध थेट मे. अमेझॉन रिटेल इंडियाच्या या गोदामाशी असल्याचे संशयास्पद पुरावे समोर आले आहेत. नियमानुसार नष्ट करण्यासाठी दिलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेचा भंग करून पुन्हा बाजारात विक्रीसाठी वळवला गेल्याचा दाट संशय आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली.
परवाना निलंबित
अमेझॉन रिटेल इंडियाने मुदतबाह्य अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी मे. आर. के. ट्रेडर्स या एजन्सीची नियुक्ती केली होती. मात्र, हा साठा नियमबाह्य पद्धतीने बाजारात पोहोचवल्याप्रकरणी एजन्सीचे मालक रहमान के. आणि अमेझॉन रिटेल इंडियाचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर कोनूर यांच्याविरुद्ध कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, परिमंडळ-१० चे सहायक आयुक्त आणि परवाना अधिकारी योगेश ढाणे यांनी जनहित आणि जनआरोग्याचा विचार करून सरवली येथील मे. अमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि. या आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. यासंदर्भात ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. ही कारवाई या गोडामापुरतीच असून या गोदामातून अन्न पदार्थ आता विक्रीसाठी पाठविण्यास बंदी असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कंपन्यांना इशारा
कोणत्याही अन्न व्यावसायिकाने किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने मुदतबाह्य अन्नपदार्थ अन्न सुरक्षा व मानके कायद्यात विहित केलेल्या कायदेशीर पद्धतीनेच नष्ट करणे बंधनकारक आहे. असा साठा कोणत्याही परिस्थितीत थेट किंवा अप्रत्यक्षपणे बाजारात विक्री अथवा वितरणासाठी ठेवता येणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास परवाना रद्द करण्यासोबतच फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला.
ग्राहकांना आवाहन
ग्राहकांनी कोणताही अन्नपदार्थ खरेदी करताना पाकिटावरील उत्पादनाची तारीख आणि मुदतीची तारीख अवश्य तपासावी. बाजारपेठेत कोठेही मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री किंवा साठवणूक होत असल्याचे आढळल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासन, ठाणे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे
