अंबरनाथ-बदलापूरः अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर महापालिका निवडणुकांच्या अंतिम उमेदवार यादी जाहीर होताच दोन्ही शहरांतील राजकारणात पुन्हा एकदा घराणेशाहीच जिंदाबाद असल्याचे दिसून आले आहे. शिंदेंची शिवसेना, भाजप, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा प्रत्येक पक्षाने तिकीट वाटपात आपल्या कुटुंबातील दोन ते पाच सदस्यांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे साध्या कार्यकर्त्यांपेक्षा ‘घर’ महत्त्वाचे ठरल्याचे चित्र उभे राहिले आहे. परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांना यंदाची निवडणुकही कार्यकर्ता म्हणूनच लढावी लागणार आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या कुटुंबियांना जवळपास ६ उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेतील घराणेशाहीची चर्चा जोरात होती. मात्र उमेदवारांची अंतिम यादी आल्यानंतर बदलापुरातील भाजप, ठाकरेंची शिवसेना, अंबरनाथमधील शिंदेची शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, अजित दादांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा सर्वच पक्षांमध्ये घराणेशाही दिसून आली.

बदलापुरातील भाजपात रूचिता घोरपडे या नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या उमेदवार असून त्यांचे पती राजेंद्र घोरपडे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. माजी उपनगराध्यक्ष शरद तेली आणि त्यांच्या पत्नी कविता तेली रिंगणात आहेत. भाजपचे महामंत्री संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी उर्मिला शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. माजी नगरसेवक रमेश सोळसे यांना त्यांच्या पत्नी हर्षदा सोळसे यांच्यासह उमेदवारी मिळाली आहे. माजी नगरसेवकांच्या पत्नी, मुले यांना मिळालेल्या उमेदवारीची यादी आणखी मोठी आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या रूपेश थोरात यांना आणि त्यांच्या पत्नीलाही रासपने उमेदवारी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत पालांडे पती – पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.

अंबरनाथ शहरात शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पत्नी, माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांना थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे. त्यांचा मुलगा निखिल आणि अरविंद वाळेकरांचे बंधू राजेंद्र वाळेकरही रिंगणात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतून करूणा रसाळ आणि त्यांचा मुलगा रोहन रसाळ, शिवसेनेचे कुणाल व त्यांच्या पत्नी अपर्णा भोईर यांनाही उमेदवारी मिळाली आहे.

शिवसेनेच्या वाळेकरांशी दुरावलेले त्यांचेच बंधूंच्या कुटुंबियांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्या कुटुंबातील पवन वाळेकर आणि त्यांच्या मातोश्री मीना वाळेकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांना उमेदवारी दिली असून करंजुलेंचे पुत्र अभिजीत आणि पत्नी अल्पना करंजुले याही रिंगणात आहेत. काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नुतन पाटील, तर त्यांचे पती ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि मुलगा विपुलही निवडणुकीच्या रिंगणात आहे. अजित दादांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शहर अध्यक्ष सदाशिव पाटील, त्यांचा मुलगा सचिन पाटील हे पिता–पुत्र मैदानात आहेत. तर त्यांची सून अश्विनी सचिन पाटील नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत.

ही यादी मोठी

एकाच घरातील एकापेक्षा अधिक सदस्यांना उमेदवारी भेटल्याची उदाहरणे सर्व पक्षात आहेत. तसेच माजी नगरसेवक, पदाधिकारी, आरक्षणामुळे लढू न शकलेले आणि ज्यांनी नातलगांना उमेदवारी दिली आहे, अशा उमेदवारांची यादी मोठी आहे. अनेक माजी नगरसेवकांच्या मुलांना, पत्नीला, भावाला, बहिणीला पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अशीही घराणेशाही टिकून आहे.