अंबरनाथ : इस्त्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण या संघर्षात देशातील दैनंदिन जीवनावरही परिणाम जाणवू लागला आहे. आखाती देशांतून होणाऱ्या इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरसारख्या शहरांमध्येही त्याची झळ बसू लागली आहे.
विशेष म्हणजे सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने कॅटरिंग व्यवसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. परिणामी कॅटरिंग व्यावसायिकांना जेवणासाठी लाकडांचा आधार घ्यावा लागतो आहे.सध्या शहरातील अनेक विवाह हॉल विविध तारखांसाठी नोंदणी आहेत. लग्नसमारंभासाठी वऱ्हाडींसाठी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी कॅटरिंग सेवा घेण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे.
साधारणपणे एका लग्नसमारंभातील शेकडो पाहुण्यांसाठी स्वयंपाक करण्यासाठी दोन ते तीन सिलेंडर लागतात. मात्र सध्या एक सिलेंडर मिळवणेही कठीण झाले आहे.या परिस्थितीत आधीच ऑर्डर घेतलेल्या कॅटरिंग व्यावसायिकांना पर्याय म्हणून लाकडांवर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे खर्च आणि वेळ दोन्ही वाढत आहेत. “साधारण २०० लोकांचे जेवण तयार करण्यासाठी गॅस सिलेंडरवर सुमारे २२०० रुपयांचा खर्च येतो.
मात्र लाकडांवर स्वयंपाक करताना सुमारे साडेतीन हजार रुपयांची लाकडे आणि त्याचा वाहतूक खर्च करावा लागतो. तसेच गॅसपेक्षा लाकडांवर स्वयंपाक करताना किमान दोन तास अधिक वेळ लागतो,” अशी माहिती कुलस्वामिनी कॅटरिंग सर्व्हिसेसचे मालक नाथा गोसावी यांनी दिली. त्यामुळे युद्धाचा आणि सिलेंडर तुटवड्याचा थेट फटका कॅटरिंग व्यवसायाला बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या काळात तुटवडा असाच कायम राहिल्यास लग्न किंवा समारंभातील कॅटरिंगचे दर वाढण्याची शक्यताही काही व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. एकीकडे सोन्याचे वाढलेले दर लग्न घरात आर्थिक बोजा वाढवणारे ठरत आहेत. त्यात जेवणावळीचे दर वाढल्यास लग्न आर्थिक बोजा वाढवणारे ठरणार आहे.
सिलेंडर तुटवड्यामुळे हॉटेल अर्धा दिवस बंद
अंबरनाथमधील हॉटेल व्यावसायिकांनाही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे गुरुवारपासून अनेक हॉटेल अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय अंबरनाथ हॉटेल असोसिएशनने घेतला आहे. तसेच उपलब्ध गॅसच्या मर्यादेमुळे हॉटेलच्या मेन्यूमध्येही कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे सदस्य दिवाकर शेट्टी यांनी दिली. ज्या पदार्थांना अधिकचा गॅस लागतो ते पदार्थ यादीतून वगळण्याचे काही व्यावसायिकांनी ठरवले आहे. त्यामुळे खवय्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
