अंबरनाथ : अंबरनाथ शहर आणि परिसरात फोफावलेल्या अमली पदार्थांच्या काळ्या बाजारावर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी दुसरा मोठा छापा टाकला आहे. या कारवाईला गती देत पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ४१३ ग्रॅम मेफेड्रोन आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे ९४ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. महिनाभरातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.
अंबरनाथमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा आणि विक्री वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. प्रसारमाध्यमांनीही हा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. याची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी स्थानिक पोलिसांची कानउघाडणी करत हे जाळे उद्ध्वस्त करण्याचे कडक निर्देश दिले होते. त्यानंतर १२ लाख रुपये किमतीचे एमडी जप्त करून फकरुद्दीन शेख आणि आसिफ शेख या दोन आरोपींना अटक केली होती.
दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी अंबरनाथमध्ये शानू उर्फ शाहनवाझ कुरेशी हा तरुण त्यांना अमली पदार्थ पुरवत असल्याची माहिती दिली. शानू हा एमडीचा साठा थेट एका नायजेरियन व्यक्तीकडून आणत असल्याची माहिती समोर आली. या माहितीनुसार अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यातील निरीक्षक सुभाष पानसरे आणि त्यांच्या विशेष पथकाने मुंब्रा-पनवेल महामार्गावरील तळोजा परिसरात फिलिप आदुबुईके या नायजेरियन नागरिकाला रंगेहाथ पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे तब्बल ४१३ ग्रॅम एमडी आढळून आले.
या धडक कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थांसह गुन्ह्यात वापरले जाणारे इतर साहित्य असा एकूण सुमारे ९४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अंबरनाथमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करणारी मोठी साखळी उघडकीस आली आहे. हा नायजेरियन नागरिक हे अमली पदार्थ नेमके कुठून आणत होता, त्याचे मुंबई किंवा नवी मुंबईत आणखी काही साथीदार आहेत का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
