अंबरनाथ: पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या कर्णकर्कश डिजेविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत अंबरनाथ शहरात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या गणेशोत्सवात गृहनिर्माण संस्थांच्या अर्थात सोसायटी आवारात डीजेचा अतिवापर आणि कानठळ्या बसवणारा आवाज आता खपवून घेतला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवल्यास आणि आवाजाची मर्यादा ओलांडल्यास, संबंधित सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संपूर्ण व्यवस्थापन समितीला थेट जबाबदार धरले जाईल, असा सक्त इशारा अंबरनाथ तालुक्याचे सहाय्यक निबंधक राजेंद्र विठ्ठल मरकड यांनी दिला आहे.
सहाय्यक निबंधक कार्यालयाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील सर्व गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीसाठी एक अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
यंदा १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर काढलेल्या या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, गृहनिर्माण संस्था हा निवासी परिसर असल्याने तिथे आवाजाची मर्यादा ४५ डेसिबलपेक्षा कमी असणे सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. मात्र, तरीही या मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेचे डीजे आणि ध्वनीक्षेपक सर्रास वापरले जातात. या अतिआवाजामुळे सामाजिक संतुलन बिघडते, तसेच वयोवृद्ध व्यक्ती, विद्यार्थी, लहान मुले, उच्च रक्तदाब व हृदयरोगाचे रुग्ण यांना ध्वनीप्रदूषणाचा प्रचंड त्रास होतो, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करून आवाजाची मर्यादा ओलांडली जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त झाल्यास, संस्था पदाधिकारी व व्यवस्थापन समिती त्यास सर्वस्वी जबाबदार राहील, अशी कडक ताकीद देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये गणेशमूर्तीचे आगमन आणि विसर्जनावेळी महाकाय डीजे वॉल लावण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली होती. यापूर्वी अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये डीजेच्या अतिप्रचंड बेसमुळे आणि दणदणाटामुळे इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटण्याचे आणि इमारतींना हादरे बसण्याचे प्रकार घडले आहेत. कानठळ्या बसवणाऱ्या या आवाजामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचा, उच्च रक्तदाबाचा आणि छातीत धडधडण्याचा त्रास होऊन त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागल्याच्या घटना भूतकाळात घडल्या आहेत. याशिवाय, डीजेच्या आवाजाच्या मर्यादेवरून अनेक सोसायट्यांमध्ये स्थानिक रहिवासी आणि तरुण मंडळी यांच्यात मोठे वाद निर्माण होऊन प्रकरणे थेट हाणामारी आणि पोलीस ठाण्यापर्यंत गेली आहेत.
उत्सवाच्या नावाखाली रुग्णांच्या आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या जीवघेण्या प्रकारांना आळा घालण्यासाठीच सहकार विभागाने यंदा उत्सवापूर्वीच ही अत्यंत कठोर आणि स्वागतार्ह पावले उचलली आहेत. प्रशासनाच्या या कडक इशाऱ्यामुळे आता सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना उत्सवादरम्यान आवाजाच्या मर्यादेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे लागणार आहे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
