अंबरनाथः अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. यात मुळ रक्कम एकरकमी भरल्यास त्या थकबाकीवरील शास्तीमध्ये ५० टक्क्यांची सूट मिळणार आहे. गेल्या आठवड्यात कुळगाव बदलापूर नगर परिषदेने ही घोषणा केली होती. तर अंबरनाथ नगर परिषदेने मंगळवारी याबाबतची घोषणा केली. नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यासाठी आणि थकबाकीसाठी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेत मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात अभय योजना लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या अभय योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार नागरिकांनी थकबाकी भरण्याचे आवाहन नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी केले आहे.
तर मंगळवारी अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी अभय योजनेची घोषणा केली. त्यानुसार अंबरनाथ शहरातील थकबाकी धारकांनी थकबाकीसह मुळ रक्कम एकरकमी भरल्यास त्यात शास्ती ५० टक्के सुट दिली जाणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तेजश्री करंजुले यांनी केले आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत लागू असणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
या अभय योजनेमुळे नागरिकांवरील थकबाकीचा भार कमी होईल आणि नगर परिषदेच्या तिजोरीतही महुसली भर पडेल अशी आशा नगर परिषद प्रशासनाला आहे. अंबरनाथ शहरात सुमारे ३८१ कोटींची शास्ती मालमत्ता धारकांवर आहे. तर या नव्या अभय योजनेमुळे मालमत्ता धारकांचे सुमारे १९० कोटी रूपये वाचणार आहेत, अशीही माहिती नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी दिली आहे. तर ज्या मालमत्ता धारकांची १९ मे २०२५ पर्यंतची थकबाकी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतरही अभय योजनेचा लाभ द्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही करंजुले यांनी स्पष्ट केले आहे.
