अंबरनाथ: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि अंबरनाथ या जुळ्या शहरांमधील नगर परिषद प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराची आणि टक्केवारीची कीड किती खोलवर रुजली आहे, याचे धक्कादायक वास्तव चव्हाट्यावर आले आहे. काही दिवसांपूर्वीच बदलापूरमध्ये केलेल्या कामाच्या बिलासाठी टक्केवारीच्या मागणीच्या आरोपातून नियोजन समितीच्या सभापतींवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अंबरनाथ नगर परिषदेच्या महासभेत चक्क सत्ताधारी शिवसेनेच्याच एका नगरसेवकाने अधिकाऱ्यांच्या टक्केवारीचा जाहीर पाढा वाचला आहे.

अंबरनाथ नगर परिषदेच्या महासभेत शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी पालिका अधिकाऱ्यांवर टक्केवारी घेण्याबाबत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. शहरात विकासकामे मिळवण्यासाठी ठेकेदार अत्यंत कमी दराची निविदा भरून कामे मिळवतात. मात्र, हे काम पदरात पडल्यानंतर पालिकेच्या व्यवस्थेमध्ये टक्केवारीचे पैसे वाटावेच लागतात, अशी थेट कबुली सोमेश्वर यांनी दिली आहे. एखादे एक लाख रुपयांचे सार्वजनिक स्वच्छतागृहांचे

बांधकाम करायचे असल्यास, ठेकेदार ४० टक्के कमी दराने निविदा भरतो, ज्यामुळे कामासाठी केवळ ६० हजार रुपये शिल्लक राहतात. या उरलेल्या रकमेतूनही २० टक्के रक्कम अधिकाऱ्यांना आणि व्यवस्थेला जाते, ज्यामुळे प्रत्यक्षात विकासकामासाठी फक्त ४० हजार रुपये उरतात. या वाटपामध्ये अधिकाऱ्यांना १२ ते १५ टक्के, तर प्रभागात १० टक्के वाटावे लागतात, असा आरोप त्यांनी भरसभागृहात केला आहे.

जर ठेकेदारांनी टक्केवारीचे हे पैसे दिले नाहीत, तर अधिकारी जाणीवपूर्वक त्यांची बिले थांबवतात आणि फाईलवर सही करून देत नाहीत. पालिकेची ही भ्रष्ट सिस्टीम वरून खालपर्यंत चालवावी लागते, असेही त्यांनी उघडपणे मान्य केले आहे. बदलापूरमध्ये टक्केवारीवरून लोकप्रतिनिधींवर झालेले हल्ले आणि अंबरनाथमध्ये नगरसेवकानेच उघड केलेली अधिकाऱ्यांची ही भ्रष्ट साखळी, यामुळे दोन्ही शहरांमधील कंत्राटदार, अधिकारी आणि विकासकामांचा दर्जा यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौकशीची दोन्हीकडून मागणी

दोन्ही शहरात टक्केवारीने टोक गाठले असले तरी दोन्ही शहरांत चौकशीची मागणीही तितक्याच आग्रहीपणे होताना दिसते आहे. बदलापुरात भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासकीय काळातील कामांच्या फेरपाहणीची आक्रमक मागणी केली होती. त्यानंतर आता विरोधात असलेल्या शिवसेनेने वर्तमानातील सर्वसाधारण सभांमध्ये मंजूर केलेल्या कामांच्या चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे अंबरनाथ शहरात सर्वच पक्ष सत्तेत असले तरी नगराध्यक्षांच्या भाजप नगरसेवकांनी अनेक जुन्या कंत्राटांच्या चौकशीची मागणी केली आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही अशीच मागणी केली आहे. या मागण्यांचे पुढे काय होते ते मात्र गुलदस्त्यात आहे.