अंबरनाथः बंदी असतानाही खासगी वाहनांवरील काचांवर काळ्या रंगाच्या फिती वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या महागड्या गाड्यांवर याचा सर्वाधिक वापर दिसून येतो आहे. या महागड्या गाड्यांकडे वाहतूक पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होतो. त्यामुळे कायदा फक्त लहान आणि सर्वसामान्य वाहनचालकांच्याच वाहनांना आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
अंबरनाथ, बदलापूर शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. मात्र नागरिकांतील बेशिस्तपणा शिस्तीला हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. आज अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील बहुतांश चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र या सिग्नल यंत्रणेनुसार वागण्याकडे अनेक वाहनचालक कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. रिक्षाचालक प्रवासी मिळवणे आणि अधिकच्या फेऱ्या मारण्यासाठी सिग्नल बंद झाल्यानंतर किंवा सुरू होण्याच्या काही सेकंड आधीच सिग्नल पार करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे अनेकदा प्रमाणिकपणे येणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडते. दुचाकीस्वारही अशाच प्रकारे अनेकदा सिग्नल मोडतात.
त्यासोबतच निवडणुकांनंतर आता दोन्ही शहरात खासगी चारचाकी वाहनांच्या खिडक्यांवरील काचांना काळ्या फित लावण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. या काळ्या इतक्या गडद असतात की अनेकदा वाहनात कोण बसले आहे हेही कळू शकत नाही. त्याचा वापर गुन्हा करण्यासाठी किंवा गैरप्रकार करण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा चारचाकी वाहनांवर काळ्या फिती लावण्यास मनाई आहे. मात्र तरीही अशा काळ्या फिती लावलेल्या वाहनांची संख्या लक्षणीय दिसते आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षांचे नेते, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आणि अतिउत्साही कार्यकर्ते यांच्या मोठ्या आणि महागड्या वाहनांवर या काळ्या काचांचे प्रमाणे अधिक असल्याचे दिसून आले आहे.
नियम पाळण्याबाबत ज्यांच्याकडून आशा असते आणि नागरिक ज्यांच्या कृतीला मानतात त्यांच्याकडूनच अशा प्रकारे नियम पायदळी तुडवला तर नागरिकांकडून काय आशा करणार असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. विशेष म्हणजे शहराच्या महत्वाच्या चौकांतून अनेकदा अशी अनेक वाहने वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोरून जातात. मात्र वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यावर कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होते आहे.
सर्वांवर कारवाई होणार
काचांना काळ्या फिती लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया अंबरनाथच्या वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक लक्ष्मण कांबळे यांनी दिली आहे. लवकरच ही कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले आहेत.

