बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील सुमारे १५० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या ‘अंबरनाथ बदलापूर स्कूल बस असोसिएशन’ने आगामी जुलै महिन्यापासून बसच्या भाडे दरांमध्ये १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधीच वाढलेल्या शाळांच्या शुल्कामुळे आणि शालेय साहित्याच्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या पालकांना आता आणखी एका आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागणार आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने आणि इतर खर्चही वाढल्याने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आखाती देशातील युद्धाच्या स्थितीमुळे गेल्या काही दिवसात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल, डिझेल आणि सिएनजी दरात गेल्या दोन महिन्यात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. परिणामी प्रवासी वाहनांनी भाडेवाढ केली आहे. लांब पल्ल्याचा वाहनांच्या दरातही वाढ झाली आहे. याच इंधन दरवाढीचा फटका आता शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासालाही बसणार आहे.
रोज वाढणारे इंधनाचे दर, टायर आणि वाहनांच्या इतर सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती, वस्तू व सेवा कर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अनिवार्य करण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, बस कर्मचाऱ्यांची चरित्र पडताळणी व्हॅरिफिकेशन प्रक्रिया आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहनांच्या फिटनेस चाचणीचे वाढलेले दर, या सर्व वाढत्या खर्चामुळे बसचे भाडे वाढवणे अपरिहार्य झाल्याचे अंबरनाथ बदलापूर स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कोसंदर यांनी सांगितले. पालकांवर जास्त बोजा पडू नये म्हणून आम्ही कमीत कमी, म्हणजेच फक्त १० टक्के दरवाढ आकारण्याचा मानस ठेवला आहे, असेही कोसंदर यांनी स्पष्ट केले.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच ही दरवाढ लागू होत असल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या खासगी शाळांचे शुल्क गगनाला भिडले असून, पुस्तके, वह्या, गणवेश आणि इतर शालेय साहित्याचे दरही कडाडले आहेत. अशा परिस्थितीत स्कूल बसच्या भाड्यात १० टक्क्यांनी वाढ होणार असल्याने पालकांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे.
विशेषतः ज्या पालकांची एकापेक्षा जास्त मुले एकाच वेळी शाळेत जातात, त्यांना या दरवाढीचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात स्कूल बस असोसिएशनने या निर्णयाचा पुनर्विचार करावा किंवा प्रशासनाने यात मध्यस्थी करावी, अशी मागणी आता स्थानिक पालकांमधून केली जात आहे.
अशी होणार दरवाढ
एखाद्या विद्यार्थ्याचे महिना बस प्रवास भाडे हजार रुपये असल्यास त्याला १ हजार १०० रुपये भरावे लागतील. तर ज्यांचे अंतर दूरचे आहे त्यांना याचा अधिक फटका बसेल. ज्याचे प्रवास भाडे १५०० रुपये आहे त्यांना १ हजार ६५० पर्यंत भाडे लागू होईल.
