अंबरनाथ : दहीहंडी आयोजकांकडून अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर दहीहंडी लावण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी या तीनही शहरांतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची भिती व्यक्त होत आहे. त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसणार असून मार्ग बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे या दिवशी घराबाहेर पडताना कोणत्या रस्त्याने प्रवास करावा याबाबत नागरिकांना प्रश्न पडला असून कोंडीत अडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

रस्त्यावर कोणतेही अडथळे नसताना फक्त नियोजनशून्य कारभारामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरसारख्या शहरांत वाहतूक कोंडी होत आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्यमार्गावर विविध ठिकाणी सुरू असलेली रस्त्याची कामे, अरूंद मार्ग यामुळे कोंडीत भर पडत आहे. त्यात सिग्नल यंत्रणेचा फायदा होण्याऐवजी अधिकचे थांबे वाढले आहेत. सध्या शहरात दहीहंडी उत्सवानिमित्त सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. यात शहरातील महत्वाच्या रस्ते, चौकांच्या कडेला आतापासूनच मंच उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.

अंबरनाथ शहरात पूर्वी केवळ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेची दहीहंडी होती. मात्र आता शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने काही फूट अंतरावर नवीन दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कल्याण बदलापूर राज्यमार्गावरही दहीहंडीची तयारी सुरू आहे. पूर्वेतील बाह्यवळण रस्त्यावरही भाजपच्या वतीने मंच उभारण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंगरेस पक्षाकडून हुतात्मा चौक आणि मनसेकडून वडवली येथील मार्गावर दहीहंडी उभारली जाणार आहे. त्यामुळे अंबरनाथमधील महत्वाचे रस्ते व्यापले जाणार आहेत. नागरिकांना या काळात कोंडीची स्थिती पाहून प्रवास करावा लागणार आहे.

बदलापूर शहरातही अशीच स्थिती होऊ शकते. उल्हासनगर शहरातही अशाच प्रकारे महत्वाचे रस्ते दहीहंडीमुळे व्यापले जाणार आहेत. आधीच अरूंद रस्त्यांमुळे या ठिकाणी अद्याप मंचांची उभारणी करण्यात आलेली नाही.

बाळगोपाळांच्या सुरक्षेचे आयोजकांपुढे आव्हान

बदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथसारख्या शहरांमध्येही आता उंचच उंच थरांची आणि बक्षिसांची स्पर्धा सुरू झाली आहे. यंदा अनेक ठिकाणी चोर हंडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या सराव हंडींचेही आयोजन करण्यात आले होते. यात बदलापूर आणि उल्हासनगरात सरावादरम्यान सर्वात वरच्या थरावर असलेल्या चिमुकल्यांचे सुरक्षा पट्टे निघाल्याचे समोर आले होते. त्यावेळी सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. मात्र या दहीहंडींच्या आयोजकांपुढे प्रसिद्धीसोबतच सुरक्षेचेही मोठे आव्हान असणार आहे.