अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर पालिका निवडणुकांसाठी इच्छुकांचे दिवाळीनिमित्त जनसंपर्क अभियान

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका आणि  उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकांसाठी पालिकास्तरावर तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकांत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेच, पण त्यासोबत मतदारांमध्येही जनसंपर्क वाढवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहे. दिवाळीनिमित्ताने शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने फराळ, उटणे यांसह विविध भेटवस्तूंचे वाटप करण्याची तयारी करण्यात येत आहे.

कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांचा कारभार मे २०२० मध्ये संपुष्टात आला. तेव्हापासून दोन्ही नगरपालिकांवर सध्या प्रशासकांचे नियंत्रण आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून दोन्ही शहरांमध्ये नगरसेवक कार्यरत नाहीत. मार्च २०२० पूर्वी निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुकांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. मात्र करोनाकाळात अनिश्चितता निर्माण झाल्याने इच्छुक भूमिगत झाले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांत माजी नगरसेवक आणि धनदांडगे इच्छुक फक्त रिंगणात उतरले आहेत. दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने यानिमित्ताने अनेक इच्छुकांनी पुन्हा जनसंपर्क मोहीम राबवण्यासाठी आराखडे आखण्यास सुरुवात केली आहे.

 दिवाळीच्या निमित्ताने फराळ, उटणे यांसोबतच भेटवस्तू देण्याची तयारी या इच्छुकांनी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय वातावरणनिर्मिती होऊ लागली आहे. नुकतेच देवळेही सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी मतदारांना देवदर्शन, फिरण्यासाठी बाहेर नेण्याच्या योजना आखल्या आहेत.

फलकबाजीतही वाढ

निवडणुकांची चाहूल लागल्याने या शहरांमध्ये फलकबाजीला उधाण आल्याचे चित्र आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहरात नगरपालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने फलकबाजी करणाऱ्यांचे फावते आहे. उल्हासनगर शहरात आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी सामाजिक कार्यकत्र्या सरिता खानचंदांनी यांच्या मागणीनंतर शहरातील अनेक बेकायदा फलक उतरवले. त्यामुळे उल्हासनगरात काही अंशी फलकबाजीवर आळा घातल्याचे दिसते आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मात्र फलकबाजीमुळे विद्रूपीकरण सुरू आहे.