बदलापूरः राज्यात सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरिक्षणाच्या कामात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापुरात असहकाराचे अडथळे येत असल्याचे दिसून आले आहे. विविध ठिकाणी बीएलओ नेमलेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर राहत नसल्याचे तसेच कामाचे आदेश स्विकारत नसल्याचे दिसून आले आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम सुरू केले असले तरी त्यांना सहकार्य मिळत नसल्याने तेही हतबल झाले आहे. त्यामुळे मतदान मॅपिंगच्या कामात अडचणींचा डोंगर असल्याचे दिसून आले आहे.
मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरिक्षण कामात बीएलओ महत्वाचे आहेत. शिक्षकांना याची जबाबदारी देण्यात आली आहे. या कार्यक्रमाची सुरूवात झाली असली तरी शहरी भागात याचे काम संथगतीने सुरू असल्याची बाब समोर आली आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांनी बीएलओची जबाबदारीच स्विकारण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया शहरातील विविध भाघात थंडावल्याची माहिती आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी मारूती गायकवाड यांनी शहरातील सहा शिक्षकांना निवडणुकीसारख्या महत्वाच्या कामामध्ये हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याचे आदेश पर्यवेक्षक यांना दिले आहेत.
यामध्ये यादी क्रमांक ९३, ९५, १०३, २१९, २२७ आणि २४९ या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील यादी भागांचा समावेश आहे. त्यामुळे बीएलओमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कामात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील मतदारांचाही निरूत्साह दिसून येतो आहे. अनेक मतदार सुट्ट्यांनिमित्त गावी निघाले आहेत. काही ठिकाणी परिक्षा असल्याने पालक त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधीही मतदारांना सहकार्याची विनंती करून दमले आहेत, अशी स्थिती आहे. त्यामुळे याचा फटका मतदार याद्यांना बसेल अशी भीती लोकप्रतिनिधींना आहे.
त्यात बीएलओ वेळेत किंवा उपस्थितच राहत नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी हतबल झाले आहेत. अंबरनाथ विधानसभेसाठी एकूण ३३९ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. यात २२८ अंबरनाथचे तर उर्वरीत १११ उल्हासनगर हद्दीतील आहेत. जिल्ह्यातील एकूण ११ पैकी अंबरनाथ या नोंदणीत ११ व्या स्थानावर आहे. तर एकूण बीएलओंपैकी जवळपास ४० बीएलओ कमी अधिक प्रमाणात काम सुरू करून त्यानंतर अनुपस्थित आहेत. त्यामुळे अशा बीएलओंना पहिल्यांदा समज देवून त्यानंतरही कामात गैरहरज राहिल्यास त्यांना नोटीस बजावर कारवाई केली जाणार आहे.
प्रतिक्रियाः आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य करतो आहोत. पण बीएलओ अनेकदा उपस्थित नसतात. त्यामुळे अडचण होते आहे. आधीच ही प्रक्रिया किचकट आणि तांत्रिक आहे. त्यात नागरिकांचा प्रतिसाद नाही. त्यामुळे मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण होईल का, याबाबत साशंकता आहे. –
श्रीधर पाटील, नगरसेवक, कुळगाव बदलापूर नगर परिषद.
प्रतिक्रियाः जे बीएलओ सहकार्य करत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पर्यवेक्षकांना सूचना दिल्या आहेत. पण बहुतांश ठिकाणी सुरळीत काम सुरू झाले आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात सुरळीतपणे काम सुरू आहे. येत्या काही दिवसात यात मोठा टप्पा पूर्ण झालेला असेल. – मारूती गायकवाड, अतिरिक्त सहा. मतदार नोंदणी अधिकारी.
शिक्षकांची दुहेरी कोंडी
बीएलओ म्हणून नेमलेल्या अनेक शिक्षकांची शाळांमध्ये परिक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. अनेकांच्या परिक्षा झाल्या असल्या तरी निकालही पूर्ण करायचा आहे. काही आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त असल्याने उपस्थित राहू शकलेले नाहीत. तर याचवेळी अनेक ठिकाणी पट पडताळणीचेही काम सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिक्षकांची तारेवरची कसरत सुरू असल्याची माहिती एका शिक्षकाने दिली आहे.
