अंबरनाथः अंबरनाथ पूर्वेतील तरुणाईचे आकर्षण आणि शहराचा प्रसिद्ध मार्ग म्हणून परिचीत असलेला पूर्वेतील बाह्यवळण रस्ता सध्या मद्यपींचा अड्डा बनत चालल्याचे चित्र आहे. विविध सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या या रस्त्याची ओळख आता अस्वच्छता आणि मद्यपींच्या उठबसमुळे बदलते आहे.याबाबत नागरिकांकडून खंत व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या परिसराचे रात्रीच्या वेळी विद्रुपीकरण होत असून अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त होते आहे.

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागातील अरूंद रस्त्यांच्या वाहतुकीला पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी लोकनगरी स्मशानभूमीपासून ते गोविंदतीर्थ पुलापर्यंत बाह्यवळण रस्ता उभारण्यात आला होता. यामुळे शहरांतर्गत वाहतुकीला पर्याय मिळाला. मात्र या मार्गावर सुरुवातीच्या काळात भरधाव दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे अनेक अपघात झाले होते. वेगवान वाहनांच्या जीवघेण्या शर्यतींमुळे अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्यानंतर प्रशासनाने येथे विविध उपाययोजना राबवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. अंबरनाथ नगरपालिकेकडून सुरुवातीपासून हा मार्ग जाहिरातमुक्त रस्ता म्हणून विकसित करण्यात आला असून, सध्या येथे वृक्षारोपण आणि सुशोभीकरणाचे उपक्रमही राबवले जात आहेत. मात्र, प्रशासनाच्या या प्रयत्नांना मद्यपी आणि रात्रीच्या वेळी गर्दी करणाऱ्या हुल्लडबाजांमुळे हरताळ फासला जात आहे.

रात्रीच्या वेळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर मद्यपींची उठबस वाढल्याने संपूर्ण परिसराचे स्वरूप बदलले आहे. रस्त्यालगत असलेल्या कट्ट्यांवर, बसण्याच्या बाकड्यांच्या मागे आणि झाडीझुडपांमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्यांचे ढीग साचले आहेत. मद्याच्या बाटल्यांच्या खचासोबतच खाद्यपदार्थांचा कचरा, उरलेले अन्न आणि प्लास्टिकचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. पालिकेकडून या मार्गाच्या स्वच्छतेकडे आणि देखरेखीकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

अस्वच्छतेसोबतच या मार्गावर आता सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. रात्रीच्या वेळी मद्यधुंद व्यक्तींचा वावर आणि त्यांचे आपापसातील वाद यामुळे येथून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या बाह्यवळण मार्गावर पोलिसांची नियमित गस्त नसल्याचाच गैरफायदा हे मद्यपी घेत आहेत. पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने मद्यपान करणाऱ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहराच्या विकासाचे आणि सौंदर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या रस्त्याची होत असलेली दुरवस्था रोखण्यासाठी आता पोलिस आणि पालिका प्रशासनाने एकत्र येऊन तातडीने संयुक्त आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे.