अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेकडील पालेगाव परिसरात एका निष्पाप मांजरीच्या पिल्लाला इमारतीच्या १२व्या मजल्यावरून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या अमानुष घटनेची राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी गंभीर दखल घेत ठाणे जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आरोपीवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

पालेगाव येथील इमारतीच्या १२व्या मजल्यावरील डक्ट (पोकळी) च्या भिंतीवर चालत असलेल्या एका मांजरीला इमारतीतीलच एका रहिवाशाने जाणीवपूर्वक खाली ढकलून दिले. मांजरीला खाली ढकलण्याचा हा संपूर्ण थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला होता. या घटनेत मांजरीचा तडफडून मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर स्थानिक प्राणिमित्रांनी तीव्र संताप व्यक्त करत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांकडून अपेक्षित अशी कठोर व जलद कारवाई न झाल्याने प्राणिप्रेमी संघटनांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. या घटनेचा सीसीटीव्ही चित्रण समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले होते. त्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.

त्यानंतर हे प्रकरण थेट मंत्रालयात पोहोचले असून मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, मांजरीच्या पिल्लाला इमारतीवरून फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे व कारवाईस होत असलेल्या विलंबामुळे प्राणीप्रेमींमध्ये रोष आहे. संबंधित आरोपीची ही विकृत कृती प्राण्यांवरील क्रूरतेच्या श्रेणीत मोडत असल्याने या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी.

मानवी जीवनाइतकेच प्राण्यांच्या जिवाचेही महत्त्व असून प्राण्यांवरील अशी क्रूरता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम मंत्री मुंडे यांनी भरला आहे. तसेच, आपण स्वतः या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगत पोलिसांनी त्वरित कारवाई पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत.