छाया रुग्णालयाचे हस्तांतरण रखडणार? | Loksatta

छाया रुग्णालयाचे हस्तांतरण रखडणार?

कै. डॉ. बी. जी. छाया रुग्णालय हे शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान होते.

छाया रुग्णालयाचे हस्तांतरण रखडणार?
नगर परिषदेचे कै. डॉ. बी. जी. छाया रुग्णालय

अंबरनाथवासीयांना दर्जेदार आरोग्य सुविधांची प्रतीक्षाच

अंबरनाथमधील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या नगरपालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात नव्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे रुग्णालय राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया प्रशासकीय अनास्थेमुळे आणखी रखडण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन चार महिने उलटल्यानंतरही करार व अन्य प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे रुग्णालयाच्या हस्तांतराची मे महिन्याची मुदत टळण्याची चिन्हे आहेत.

अंबरनाथ तालुक्यातील रुग्णांच्या सेवेत असलेले नगर परिषदेचे कै. डॉ. बी. जी. छाया रुग्णालय हे शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान होते. मात्र गेल्या काही वर्षांत या रुग्णालयाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. रुग्णांना येथे पुरेशा सुविधाही उपलब्ध होत नसल्याने अनेकदा रुग्णांचे हाल पाहायला मिळत होते. तसेच अपुरे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळेही येथे रुग्णसेवेवर परिणाम होत होता. त्यामुळे या रुग्णालयाला सक्षमपणे चालवण्यासाठी आणि रुग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार ऑक्टोबर २०१६ मध्ये याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याचा शासन निर्णय नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात आला. त्यानुसार येत्या सहा महिन्यांत या रुग्णालयाचे हस्तांतरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे १६ मे पूर्वी हे हस्तांतरण होऊन यातील संपूर्ण व्यवस्था ही राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली जाणे अपेक्षित आहे. यासाठी गेल्या चार महिन्यांत सात ते आठ बैठका झाल्याचे कळते आहे. तसेच आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनाही रुग्णालयाला भेट दिली आहे. मात्र या हस्तांतरणासाठी महत्त्वपूर्ण करार होणे आवश्यक असून तोच रेंगाळल्याने हस्तांतरण रखडले आहे.

जागा नावावर केल्यानंतरच हस्तांतरण होईल असे राज्य शासनाकडून सांगण्यात येत असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. मात्र करार झाल्याशिवाय जागा वर्ग कशी करणार, असा सवाल पालिका अधिकारी उपस्थित करत आहेत. नियमानुसार १६ मे नंतर रुग्णालयाचा कारभार हा राज्य शासनाकडे जायला हवा. मात्र तसे होण्याची शक्यता धूसर असल्याचे समजते. दुसरीकडे पालिकेनेही १६ मेनंतर रुग्णालय चालवण्याची जबाबदारी आपली नसेल, अशी भूमिका घेतली आहे. तसेच येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे आधीच खस्ता खात सुरू असलेल्या या रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांना विचारले असता, यासंदर्भात अनेक बैठका झाल्या असून त्यानुसार कागदपत्रांची पूर्तताही सुरू आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या असून येत्या काही दिवसांत त्या पूर्ण होण्याची आशा आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-04-2017 at 03:19 IST
Next Story
वसईकरांच्या वाहनखरेदीत वाढ!