अंबरनाथ: अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा गोवंश हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, चिंचपाडा भागातील खदानीसमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गोवंशाचे अवशेष आढळून आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शहरात छुप्या पद्धतीने गोहत्या सुरूच असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अंबरनाथमधील चिंचपाडा खदान परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आज स्थानिक नागरिकांना गोवंशाचे अवशेष छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले. अज्ञात इसमांनी गोवंशाची हत्या करून त्याचे अवशेष पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने किंवा लपवण्यासाठी या निर्जन ठिकाणी आणून टाकल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि काही संघटनांनी घटनास्थळी धाव घेतली.
काही महिन्यांपूर्वी अंबरनाथमध्ये गोमांस विक्री आणि गोहत्येविरुद्ध मोहीम राबवत कारवाई करण्यात आली होती. पोलिसांच्या त्या धाडसी सत्रामुळे शहरातील बहुतांश अवैध गोमांस विक्रीची दुकाने आणि कत्तलखाने बंद झाले होते. मात्र, त्यानंतर मात्र अशा घटनांमुळे चर्चा रंगल्या आहेत. हे अवशेष नेमके कुठून आणून टाकण्यात आले, यामागे कोणती टोळी सक्रिय आहे, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी पोलीस आता काय ठोस पावले उचलतात आणि दोषींवर कधी कारवाई करतात, याकडे अंबरनाथकरांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी गुन्हे दाखल
बदलापुरातील अनधिकृत कत्तल खान्यांवर कारवाई झाल्यानंतर त्याचवेळी अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात विविध ठिकाणी सुरू असलेल्या गोवंश मांस विक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली होती. यावेळी गुन्हेही दाखल करण्यात आले होते. बदलापुरातून नजिकच्या शहरांमध्ये गोमास विक्रीसाठी नेले जात असल्याचा प्रकारही काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यामुळे या सर्व घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होते आहे.
