अंबरनाथ: अंबरनाथ शहर आणि परिसरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, अवघ्या तीन घटनांमध्ये नागरिकांची तब्बल ५० लाख १७,l हजार ६३८ रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष आणि गॅस बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने नागरिकांना हा गंडा घालण्यात आला आहे. अंबरनाथ पश्चिम आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत अंबरनाथ पश्चिम येथील २७ वर्षीय व्यक्तीला शेअर मार्केटच्या आमिषाने तब्बल २० लाख ८० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. आरोपी राजिव सिंग आणि मिनाक्षी यांनी व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून त्यांची मार्क सीएम नावाची कंपनी असल्याचे भासवले आणि मार्क सिक्युरिटी नावाचे ॲप तक्रारदाराच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास लावले. शेअर मार्केटमध्ये फायदा होईल असे सांगून सुरुवातीला ५० हजार रुपये गुंतवण्यास लावले व ॲपवर नफा दाखवण्यात आला. अधिक फायद्याच्या आशेने त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून आरोपींनी कस्टमर केअरद्वारे दिलेल्या आणि इतर खात्यांवर वेळोवेळी एकूण २० लाख ८० हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली.
अशीच एक दुसरी घटना अंबरनाथ पश्चिम भागात घडली असून, २६ वर्षीय व्यक्तीची १८ लाख २३ हजात ५०० रुपयांची फसवणूक झाली आहे. एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना स्मार्ट फ्लो नेटवर्क या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक पाठवण्यात आली होती. ग्रुपमधील अभि आणि राहुल नावाच्या व्यक्तींनी शेअर मार्केटची माहिती देऊन अनँटियम प्लस नावाचे ॲप इन्स्टॉल करायला लावले आणि सुरुवातीला ३० हजार रुपये गुंतवण्यास सांगितले. खोटा नफा दाखवून आरोपींनी प्रकाश तसेच त्यांचे मित्र आसंगी आरीफ हुसेन आणि जयेश देवदास पाटील यांच्या बँक खात्यांतून कस्टमर केअरने दिलेल्या वेगवेगळ्या खात्यांवर रक्कम जमा करण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात १८ लाख २३ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तर तिसऱ्या घटनेत सायबर भामट्यांनी गॅस बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने अंबरनाथ पूर्वेतील एका नागरिकाचा मोबाईल हॅक करून तब्बल ११ लाख १४ हजार १३८ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.सातत्याने व्हाट्सअप, ऑनलाईन शेअर बाजार आणि गॅस बिलाच्या नावे लाखो रुपयांची फसवणूक केली जाते आहे. मात्र त्यानंतरही नागरिक अशा जाळ्यातून फसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
