अंबरनाथ : शहरात मोठ्या दिमाखात उभारण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचे लोकार्पण होऊन अवघे पाच महिने झाले असतानाच, या वास्तूतील गंभीर तांत्रिक त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत. या नाट्यगृहात शनिवारी ‘द दमयंती दामले’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंगमंचाचा पडदा अडकला तसेच ध्वनिक्षेपक यंत्रणा कोलमडली.

अखेर कलाकारांना स्वतः हाताने पडदा बाजूला करावा लागला. नगरपालिकेच्या या अनास्थेमुळे कलाकार आणि नाट्यप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अंबरनाथ शहरातील य. मा. चव्हाण खुले नाट्यगृह जमिनदोस्त करण्यात आल्याने शहरातील नाट्यचळवळीला खीळ बसली. अंबरनाथ शहरातील कलाकारांसह कला रसिकांनी वेळोवेळी शहरात नाट्यगृह उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदानात नाट्यगृहाची उभारणी सुरू झाली.

Award Banner

गेल्या वर्षात १९ ऑक्टोबर रोजी नाट्यगृहाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर सात दिवसांचा नाट्य महोत्सवही आयोजीत करण्यात आला होता. दर्जेदार नाटकांचे प्रयोग येथे संपन्न झाले.

मात्र त्यानंतर येथे नाटकांची संधी रोडावली. नुकताच येथे विशाखा सुभेदार यांच्या ‘द दमयंती दामले’ नाटकाच्या प्रयोग झाला. या नाटकाच्या मध्यंतरानंतर जेव्हा प्रयोग पुन्हा सुरू होणार होता, तेव्हा तांत्रिक बिघाडामुळे रंगमंचाचा पडदा उघडेनासा झाला. यावेळी तिथे संबंधित तंत्रज्ञ उपस्थित नसल्याने गोंधळ उडाला.

शेवटी प्रेक्षकांसमोरच कलाकारांना स्वहस्ते पडदा ओढून प्रयोग पुढे न्यावा लागला. केवळ पडदाच नव्हे, तर ध्वनिक्षेपक यंत्रणेतही बिघाड झाला. हा बिघाड दूर करण्यात तंत्रज्ञाला वेळ लागला. त्यामुळे प्रेक्षक आणि कलाकारांचा खोळंबा झाला. त्यामुळे प्रेक्षकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. तर आयोजकांनीही नाट्यगृह प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

यापूर्वीही अनेक प्रयोगांच्या वेळी नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा वारंवार बंद पडण्याच्या तक्रारी आल्या होत्या. अंबरनाथ नगर परिषदेच्या या वास्तूत अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण ग्रामीणमधील रसिक मोठ्या संख्येने येतात. नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर अद्याप समाधानकारक नाट्यकांचे प्रयोग येथे झालेले नाहीत. त्यातही अनेक निर्माते येथे नाट्यप्रयोगासाठी प्रयत्नशील असतात. मात्र लोकार्पणाच्या काही महिन्यातच अशा प्रकारे तांत्रिक बिघाडाने कलाकार आणि प्रेक्षकांचा खोळंबा होत असेल तर त्याचा भविष्यातील नाट्यप्रयोगांवर परिणाम होईल, अशी भीती कला रसिकांना वाटते.

प्रतिक्रियाः पडद्याच्या टाळेबंदी यंत्रणेवर चुकीचा दाब आल्यामुळे तो उघडण्यास अडथळा निर्माण झाला होता. कोणतीही मोठी तांत्रिक समस्या झाली नव्हती. तरीही या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल. – उमाकांत गायकवाड, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगर परिषद.