अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिम येथील भगतसिंग नगर परिसरात पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले असून, एका आरोपीला अटक केली आहे. शरीफ सलीम शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख ५४ हजार ७०० रुपये किमतीची २४.४२० ग्रॅम वजनाची हेरॉईन पावडर जप्त केली आहे. याशिवाय आरोपीकडून १५ हजार ५०० रुपये किमतीच्या १५५ सोल्यूशन आणि थिनरच्या बाटल्या, तसेच २ हजार २५० रुपये किमतीच्या निट्राजोम १०’ कंपनीच्या एकूण ५०० अंमली गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व जप्त केलेल्या साठ्याची एकूण किंमत तब्बल ८ लाख ९० हजार रुपये इतकी आहे.
५ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ पश्चिम येथील भगतसिंग नगरमधील मशीद जवळील गल्लीतील एका मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. आरोपी शरीफ सलीम शेख याने हा सर्व अंमली पदार्थांचा साठा बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी आणला होता. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे अंबरनाथमधील अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याच भगतसिंग नगर भागात यापूर्वीही लाखो रुपयांचे अंमली पदार्थ पकडण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचे पाहून एका प्रसंगी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या भागातील अंमली पदार्थ पकडून दिले होते आणि पोलिसांच्या हवाली केले होते. वारंवार घडणाऱ्या या गंभीर घटनांमुळे भगतसिंग नगर परिसर अंमली पदार्थ विक्रेत्यांचा सुरक्षित अड्डा बनला आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या भागात सातत्याने अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री होत असतानाही, पोलिसांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या या कथित ढिसाळ कारभारामुळे स्थानिक तरुणाई व्यसनाच्या गर्तेत ओढली जात असून, केवळ नावापुरती कारवाई न करता या टोळीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन हा अंमली पदार्थांचा व्यवसाय कायमचा उद्ध्वस्त करावा, अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी केली आहे.
