अंबरनाथ: अंबरनाथ पूर्व परिसरातील लोकनगरी आणि पालेगाव या गजबजलेल्या भागांमध्ये महावितरणच्या मुख्य सर्व्हिस वायरला थेट आकडे टाकून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांसह एकूण ११ जणांवर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्यान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये महावितरणच्या मुख्य विद्युत वाहिनीला छेडछाड करून थेट वीजपुरवठा मिळवण्याची शक्कल लढवण्यात आली होती. यात एकूण ६ जगात ८३६ युनिट्सची, म्हणजेच दोन लाख रुपयांहून अधिक किमतीची वीज चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

पहिला प्रकार अंबरनाथ पूर्वेकडील लोकनगरी परिसरात उघडकीस आला. या भागात महावितरणच्या पथकाने राबवलेल्या विशेष मोहिमेत परिसरातील विविध व्यावसायिक दुकानांमध्ये सर्रासपणे वीजचोरी सुरू असल्याचे निदर्शनास आले. परिसरातील एका भंगाराच्या दुकानात, केशकर्तनालय, ज्यूस सेंटर, इंजिनिअरिंग वर्कशॉप, मांस विक्री आणि एका अन्य दुकानात मीटरला बगल देऊन मुख्य सेवा वाहिनीतून थेट टॅपिंग करून वीज वापरली जात होती. या सहाही व्यावसायिकांनी मिळून तब्बल ६ हजार २९० युनिट्सची वीज चोरली असून, यामुळे महावितरणचे तब्बल १ लाख ९० हजार २७० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या सहाही दुकानचालकांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दुसऱ्या घटनेत, पालेगाव परिसरातील विविध गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक संकुलांमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. येथील ओम साई रेसिडेन्सी, पनवेलकर क्लासिक बिल्डिंग नं ४, राधे गोविंद प्लाझा, रोजबेरी पनवेलकर प्रेस्टिज आणि परशुराम वेदांत या इमारतींमधील काही रहिवासी आणि गाळेधारकांनीही थेट सेवा वाहिनीला टॅपिंग करून वीजचोरी केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे एका इमारतीच्या कॉमन मीटरसाठीही अशाच प्रकारे थेट वीज घेतली जात होती. या तपासणीत एकूण ५४६ युनिट्सची अर्थात सुमारे १४,३०० रुपये वीज चोरीला गेल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणी संबंधित पाच जणांवर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधितांनी अत्यंत चलाखीने मुख्य वाहिनीला टॅपिंग करून थेट वीजपुरवठा मिळवला होता. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे अंबरनाथ परिसरातील वीज चोरांचे धाबे दणाणले असून, अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा यापुढेही अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा महावितरण प्रशासनाने दिला आहे. सध्या अंबरनाथ पश्चिम पोलीस या दोन्ही गुन्ह्यांचा सखोल तपास करत आहेत.