अंबरनाथः अंबरनाथ शहरातून चालवणाऱ्या जाणाऱ्या एका कॉल सेंटरच्या माध्यमातून थेट अमेरिकेतील ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी कल्याण बदलापूर राज्यमार्गावर असलेल्या एका व्यावसायिक संकुलात सुरू असलेल्या कॉल सेंटरवर धाड टाकत पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, संगणक जप्त करण्यात आले आहे. यापूर्वीही अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतून एका बोगस कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली होती.

ऑनलाईन कॉल सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकरण काही नविन नाही. मात्र भारतातून तेही ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ शहरातून अमेरिकी नागरिकांना लुबडण्याचा प्रकार अंबरनाथ शहरातून उघडकीस आला आहे. अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात कल्याण बदलापूर राज्य मार्गावर ग्लोब या व्यावसायिक संकुलात रुद्रा टेक आयटी या कंपनीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी धडक दिली. या कपंनीत कॉल सेंटर चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या कंपनीतून कर्मचारी अमेरिकेतील ग्राहकांना मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क करत होते. त्या माध्यमातून अमेरिकी ग्राहकांना सॉफ्टवेअर विक्री केली जात होती. सॉफ्टवेअर विकत घेण्यासाठी ग्राहकांना आकर्षीत केले जात होते. तसेच सॉफ्टवेअर खरेदीच्या नावाखाली ग्राहकांचा विश्वास मिळवला जात होता. त्यानंतर ग्राहकाला काही पैसे आगाऊ देण्यासाठी मागणी केली जात होती. सॉफ्टवेअर खरेदीसाठी ग्राहकाला पैसे देण्यासाठी पर्याय दिले जात होते. ग्राहकाने पैसे भरताच त्याला ब्लॉक केले जात होते, अशी माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली आहे.

याप्रकरणी मालक कमलेश सचवानी याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दररोज १०० ते २०० जणांना फोन करण्याचे उद्दिष्ट दिले जात होते. त्यातून खरेदीसाठी तयार होणाऱ्या ग्राहकाला लुबाडले जात होते. त्यांच्या फसवणुकीची रक्कम किती ते लवकरच स्पष्ट होईल, असेही शब्बीर सय्यद यांनी सांगितले आहे. यात सध्या तरी पाच जण सक्रीय असल्याचे दिसून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी कुणाचा सहभाग तपासात उघड झाल्यास कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बोगस कॉल सेंटरचा इतिहास

अंबरनाथ शहरात यापूर्वीही बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ पूर्वेतील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील उद्योग भवनात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी धाड मारली होती. त्यावेळी शहराबाहेरच्या पोलिसांनी कारवाई केली होती. यावेळी स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.