अंबरनाथः बनावट कागदपत्रे सादर करून मुळ मालकांच्या ऐवजी बोगस व्यक्ती उभे करून भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ तालुक्यात समोर आला होता. त्यानंतरही बनावट कागदपत्रे सादर करून दाखले मिळवण्याचा प्रकार अजुनही उपविभागीय कार्यालयात सुरू असल्याचे समोर आले आहे. ज्या विद्यार्थ्याच्या नावे २०२० मध्ये जात प्रमाणपत्र मिळवले होते. त्याच विद्यार्थ्याच्या नावे त्याच्या विभक्त आईने दुसरा दाखला तयार करून घेतल्याचा आरोप अंबरनाथ तालुक्यातील आशेळे येथील हनुमान कडून यांनी केला आहे. शासकीय सेवेत असणाऱ्या अर्जदार महिलेला सर्वच ठिकाणी विशेष प्रशासकीय सहकार्य मिळल्याची चर्चा रंगली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणाच्या उभारणीला विविध माध्यमातून अडथळे येत आहेत. त्यातील सर्वात मोठा अडथळा या धरणाच्या भूसंपादन मोबदला लाटण्याच्या प्रकारामुळे आला होता. उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयातील आजी माजी कर्मचाऱ्यांनी मिळून बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत आणि हयात असलेल्या व्यक्तींच्या ऐवजी दुसऱ्यांनाच मोबदला मिळवून दिला होता. याप्रकरणी अद्याप शासनाची लाटली गेलेली लाखो रूपयांची रक्कम अद्याप परत मिळालेली नाही. या प्रकारानंतर उपविभागीय कार्यालयातील अशा प्रकारांना आळा बसण्याची गरज होती.

मात्र त्यानंतरही बनावट दस्तऐवजांच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र तयार करून त्याची पडताळणीही झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आशेळे गावातील हनुमान कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२० मध्ये त्यांनी अंबरनाथ तहसील कार्यालयात अधिकृत अर्ज करून उल्हासनगर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने मुलाच्या शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र काढले होते. मात्र त्यानंतर २०२२ मध्ये त्यांच्या विभक्त पत्नीने त्याच मुलाच्या नावाने जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट व्यक्ती उभी करून, कडू कुटुंबातील बनावट कागदपत्रे जोडून सत्यप्रतिज्ञापत्र सादर केले. त्यावर अंबरनाथ तहसिल आणि उल्हासनगर उपविभागीय कार्यालयाने कोणतीही पडताळणी आणि दफ्तर नोंदी न तपासता दुसरे सारख्याच नावाचे जात प्रमाणपत्र दिले, असा आरोप कडू यांनी केला आहे.

धक्कादायक म्हणजे ही बाब उघडकीस आल्यानंतर कडून यांनी जात पडताळणीसाठी असलेल्या याच जात प्रमाणपत्राच्या अर्जावरही आक्षेप घेतला होता. मात्र पडताळणी झाल्याचे सांगत त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. याबाबत उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांना विचारले असता, हे जुने प्रकरण असून याबाबतची याबाबत योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

या प्रकाराबाबत अंबरनाथ पोलीस ठाणे, उपविभागीय कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे. मात्र अद्याप काहीही तपास झाला नाही. माझाच जबाब नोंदवला जातो आहे. या प्रकरणात अंबरनाथ तहसिल कार्यालयातील दाखले वितरण करणारी खासगी यंत्रणा, कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी. – हनुमान कडू, तक्रारदार.