अंबरनाथ: ‘मम्मी पप्पा, माझ्याने पोलिस भरती नाही झाली आणि पुढे माझ काय फ्युचर आहे नाही माहित. तुम्ही मला कधीच जॉबसाठी फोर्स नाही केला. सरकारी नोकरी तर मलाच पाहिजे होती पण माझ्याने नाही झाल म्हणून मी स्वताला संपवते’, अशी भावनिक चिठ्ठी लिहून एका २६ वर्षीय तरुणीने अंबरनाथमध्ये स्वतःचे आयुष्य संपवले. सरकारी नोकरीचे स्वप्न करण्यात अपयश आल्याने प्रतिक्षा राणे या तरुणीने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूमुळे अंबरनाथच्या जुना भेंडीपाडा परिसरात शोककळा पसरली आहे.
अंबरनाथच्या भेंडीपाडा परिसरात राहणाऱ्या राणे कुटुंबीयांची प्रतीक्षा ही एकुलती एक मुलगी होती अशी माहिती आहे. ती गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलातील नोकरीसाठी सातत्याने प्रयत्न करत होती. मात्र त्यात तिला यश येत नव्हते. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. गुरुवारी तिने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या तरुणीने चिठ्ठी लिहून आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले असून मनातील अपयशाची खंतही लिहिले आहे. चिठ्ठीत प्रतीक्षाने आई-वडिलांची माफी मागत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. ‘सरकारी नोकरी मिळवू शकले नाही, पुढे काय करायचे हे समजत नाही. तुम्ही माझ्यावर कधीच दबाव टाकला नाही. पण मला स्वतःला काहीतरी करून दाखवायचे होते. २६ वर्षांची होऊनही कुटुंबासाठी काही करू शकले नाही, ही खंत मनात आहे’, असे तिने लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.
राणे कुटुंबातील एकुलत्या एक मुलीच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.परिसरातही हळहळ व्यक्त होते आहे.
