अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील वाढते नागरीकरण आणि औद्योगिक क्षेत्राचा वेगाने होणारा विस्तार यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी बदलापूर वनविभागाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. अंबरनाथ औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या गोरपे गावच्या हद्दीतील वनविभागाच्या २५ एकर जागेवर तब्बल ११ हजार ५०० वृक्षांची लागवड करून तेथे एक भव्य मानवनिर्मित जंगल उभे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

बदलापूर वनविभाग, टाटा रिॲलिटी आणि एके रुरल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या व्यापक वृक्षारोपण मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवातही करण्यात आली आहे. बदलापूर वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे आणि आंभे परिमंडळ अधिकारी सिद्धार्थ मोहने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याकामी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि टाटा रिॲलिटी व एके रुरल ट्रस्टचे प्रतिनिधी सहभागी झाले. यापूर्वीही बदलापूर वनविभागाने अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ आणि गोरपे गावाला लागून असलेल्या पाले गावच्या हद्दीत अशीच मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड यशस्वीपणे केली होती. त्या ठिकाणी आता मानवनिर्मित जंगलाचा विस्तार झाला असून, परिसराने हिरवेगार स्वरूप धारण केले आहे. त्याच यशस्वी प्रयोगाची पुनरावृत्ती आता गोरपे परिसरात केली जात आहे.

अंबरनाथ शहर आणि त्यालगतचा औद्योगिक परिसर झपाट्याने विकसित होत असल्याने कार्बन उत्सर्जनाचे आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. यावर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची आणि मोठ्या प्रमाणावर हिरवाई निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे गोरपे आणि पालेगाव परिसरातील हे नव्याने विकसित होणारे वनक्षेत्र भविष्यात अंबरनाथ शहरासाठी एक प्रमुख आणि महत्त्वाचे प्राणवायू केंद्र ठरणार आहे. या माध्यमातून केवळ शहराचे पर्यावरणीय संतुलनच राखले जाणार नाही, तर परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासही मोठी मदत होणार आहे.

केवळ वृक्षलागवड करून न थांबता, या लावलेल्या रोपांचे संवर्धन आणि संगोपन करण्यावरही वनविभागाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. या परिसरात मोठे मानवनिर्मित जंगल विकसित करून तेथील जैवविविधता वाढवणे, पक्षी व वन्यजीवांसाठी सुरक्षित नैसर्गिक अधिवास निर्माण करणे आणि औद्योगिक वसाहतीच्या सीमेवर एक मजबूत हिरवे कवच तयार करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. अंबरनाथच्या पर्यावरण संवर्धनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.