अंबरनाथ : अंबरनाथ येथे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या २०० विद्यार्थ्यांना रुग्णसेवेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळण्यासाठी अखेर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला आहे.

अंबरनाथमधील डॉ. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालय आणि उल्हासनगरचे मध्यवर्ती रुग्णालय या दोन्ही ठिकाणी अतिदक्षता विभाग अर्थात’आयसीयू’सुविधा उपलब्ध नसल्याने, महाविद्यालयाने रुग्णसेवेच्या अनुभवासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेशी सात वर्षांचा सामंजस्य करार केला आहे. या निर्णयामुळे एका बाजूला विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असला, तरी दुसरीकडे स्थानिक शासकीय रुग्णालयांमध्ये आयसीयू सुविधेच्या कमतरतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अंबरनाथ शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंजूर झाले आहे. सध्या महाविद्यालयाच्या स्वतःच्या इमारतीचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित आहे. असे असले तरी एमबीबीएसच्या दोन तुकड्यांचे शिक्षण सुरू असून त्यासाठी एका खासगी जागेचा वापर केला जातो आहे.

आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्या बॅचची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. वैद्यकीय प्रशिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष रुग्णसेवा आणि सरावाची आवश्यकता होती. ज्यासाठी अतिदक्षता विभाग आणि किमान ४२० बेड असलेल्या रुग्णालयाची गरज असते. मात्र, स्थानिक शासकीय रुग्णालयांमध्ये या सोयी नसल्याने नाईलाजास्तव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाशी संलग्नता करावी लागली आहे.

अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अनुभवासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेची बाई रुक्मिणीबाई, शक्तीधाम आणि गौरीपाडा ही रुग्णालये तात्पुरत्या स्वरूपात सात वर्षांसाठी मिळवली असल्याची माहिती दिली आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, सभागृह नेते वरुण पाटील आणि अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना सरावासोबतच वसतीगृहाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या यशस्वी करारामुळे विद्यार्थ्यांच्या रुग्णसेवेचा प्रश्न सुटला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा यांनी दिली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असणारे आयसीयू आणि ४२० खाटांचे रुग्णालय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात उपलब्ध झाले आहे. या सोयींमुळे विद्यार्थ्यांना आता अधिक प्रभावीपणे आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येणार आहे, असेही वर्मा यांनी सांगितले आहे. दरम्यान, या करारामुळे अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील शासकीय रुग्णालयांतही तातडीने आयसीयू सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.